हजारो ग्रामस्थ घरकुलापासून वंचित
By admin | Published: October 26, 2015 01:10 AM2015-10-26T01:10:06+5:302015-10-26T01:10:06+5:30
तालुक्यातील हजारो ग्रामस्थ अजूनही घरकुलापासून वंचित आहेत. शासनाच्या नियमावलीत शुद्धता नसल्याने त्याचा फटका अनेकांना बसून त्यांना उघड्यावर जीवन जगावे लागत आहेत.
ब्रह्मपुरी तालुका : दुरुस्तीसाठी पैसे नाही व नवीन घरकूलही नामंजूर
ब्रह्मपुरी : तालुक्यातील हजारो ग्रामस्थ अजूनही घरकुलापासून वंचित आहेत. शासनाच्या नियमावलीत शुद्धता नसल्याने त्याचा फटका अनेकांना बसून त्यांना उघड्यावर जीवन जगावे लागत आहेत.
कुणीही निवाऱ्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी शासनाच्या अनेक योजना सुरू आहेत. परंतु जाचक अटींमुळे कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी गरिबांची दमछाक होत आहे. एक वेळ अशी येते की, आपली टूटकी फुटकी झोपडीच बरी, नको शासनाचे घर अशी अवस्था सद्या ब्रह्मपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.
अऱ्हेरनवरगाव, पिंपळगाव, खेड, अड्याळ (जाणी) वायगाव, चोरटी, गांगलवाडी, मेंडकी, आवळगाव, एकारा, मुडझा, हळदा या गावासमवेत परिसरातील अनेक गावांमध्ये खऱ्या लाभार्थ्यांना हक्काचे घरकूल मिळत नसल्याने गरिबांचा कुणीच वाली नसल्याचे दिसून येत आहे.
२०-२५ वर्षापूर्वी जे घरकूल मोडकळीस आले, त्यांना सुधारण्यासाठी १० हजार रुपये मदत देण्यात आली. त्यामुळे अशाना नवीन घरकूल मंजूर होत नसल्याने त्यांना मोडलेल्या घरातच राहावे लागत आहे. १० हजारामध्ये घरकुल दुरुस्त होत नसल्याने अर्धवट स्थितीतील घरामधून पाणी गळणे किंवा इतर त्रासांमुळे नवीन घरकूल देण्याची मागणी कित्येक ग्रामस्थ अनेक वर्षापासून करीत आहेत. परंतु, अशा गरजूंकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.
तरी शासनाने गरजू व खरोखर मोडकळीस आलेल्यांना नवीन घरकूल देण्याची मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)
पंचायत समितीकडून लाभार्थ्यांचे ठराव पाठविलेले आहे. ही मागणी अनेकदा वरिष्ठांकडे केली असून यावर तोडगा काढण्यात येईल.
- नेताजी मेश्राम
सभापती, पंचायत समिती ब्रह्मपुरी