दीड हजार गावांना मिळणार भरीव निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 10:38 PM2018-08-04T22:38:20+5:302018-08-04T22:39:17+5:30
जिल्ह्यातील पंधराशेहून अधिक गावांना प्रधानमंत्री क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत विविध आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी थेट निधी मिळणार आहे. हा निधी थेट ग्रामपंचायतीला मिळणार असून यासंदर्भातील प्रस्ताव सादर करावे, अशी सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात शनिवारी पार पडलेल्या सरपंच मेळाव्यात ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील पंधराशेहून अधिक गावांना प्रधानमंत्री क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत विविध आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी थेट निधी मिळणार आहे. हा निधी थेट ग्रामपंचायतीला मिळणार असून यासंदर्भातील प्रस्ताव सादर करावे, अशी सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात शनिवारी पार पडलेल्या सरपंच मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आ.म.यादव, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, अर्चना जिवतोडे, वरोरा पंचायत समिती सभापती रोहिणी देवतळे, भद्रावतीच्या सभापती विद्या कांबळे, पोंभूर्णाच्या सभापती अल्का आत्राम, गोंडपिपरीचे सभापती दीपक सातपूते, प्रवीण सुर, राजू गायकवाड, मारोती गायकवाड उपस्थित होते.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, केंद्र शासनाने देशातील सर्व राज्यांमधील खनिज विकास प्रतिष्ठान मार्फ त क्षेत्राचा विकास व्हावा, यासाठी योजना आखली आहे.
खाणीमुळे बाधीत झालेल्या गावांमध्ये सामाजिक विकास व मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी निधीचा वापर केला जाणार आहे. नागरिकांना शाश्वत उपजीविकेचे साधन मिळावे, यासाठी निधीचा वापर करण्याचे दिशा निर्देश केंद्र शासनाने दिलेले आहे. महाराष्ट्रात चंद्रपूर हा सर्वाधिक खनिज बाधित जिल्हा आहे. त्यामुळे जादा निधी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबतचे सादरीकरण जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. जी. डी. कामडे यांनी केले.
निधीचा असा होईल विनियोग
केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या निधीचा वापर गावातील शुद्ध पेयजलासाठी करावा. प्रत्येक गावाने एटीएम आरो मशीन लावावे. शाळा, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्रातही सोलर यंत्राद्वारे शाश्वत वीजपुरवठा करावा. गावाच्या शेजारील नाल्याचे खोलीकरण करण्यासाठी निधी खर्च केला जाणार आहे. यासाठी सरपंच कृती आराखडा तयार करणार आहेत.