चंद्रपूर व गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागातील शेकडो गावे प्रकाशणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:24 AM2018-02-17T11:24:31+5:302018-02-17T11:25:18+5:30
चंद्रपूर परिमंडळातील चंद्रपूर जिल्ह्यात १ हजार १४६ नवीन वितरण रोहित्र उभारण्याचे काम सुरू झाल्याने आदिवासी भागातील शेकडो गावे प्रकाशमान होण्याची आशा निर्माण झाली.
राजेश मडावी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर परिमंडळातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील वनव्याप्त दुर्गम, आदिवासी भागात वीज पुरवठा करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, या दोन्ही जिल्ह्यात १ हजार १४६ नवीन वितरण रोहित्र उभारण्याचे काम सुरू झाल्याने अनेक वर्षांची समस्या दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात २०१४ मध्ये २ हजार ७८४ तर २०१४-१७ या वर्षात १ हजार ८२३ नवीन वितरण रोहित्र उभारण्यात आले. मात्र, नक्षलग्रस्त व जंगली भागातील शेकडो गावांना वीज पुरवठा करणे कठीण झाले होते. ग्राहकांच्या वाढत्या मागणीनुसार वीज खांब उभारण्यासोबतच वितरण रोहित्रांची आवश्यकता पूर्ण करताना समस्येला तोंड देण्याची वेळ वीज वितरण कंपनीवर आली. दरम्यान, महावितरणने पायाभूत विकास आराखड्याअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ३६७ रोहित्र उभारण्याचा निर्णय घेतला. यातील ५० टक्के कामे पूर्ण झाले असून उर्वरित कामे सुरू आहेत. याशिवाय, २६ वितरण रोहित्रची क्षमता वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले. उच्चदाब तसेच लघुदाब वाहिनी, ३३/११ केव्ही नवीन उपकेंद्र व अतिरिक्त रोहित्रची गरज लक्षात सुमारे ८२ कोटींच्या कामांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील शेकडो गावे प्रकाशमान होण्याची आशा निर्माण झाली. चंद्रपूर जिल्ह्यातही ७७९ रोहित्रची कामे सुरू असून १४० वितरण रोहित्रच्या क्षमतेत वाढ केली जात आहे.
४० हजार नागरिकांपर्यंत पोहोचणार ग्रामज्योती
दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गत चंद्रपूर १३ हजार ६३२ आणि गडचिरोली जिल्ह्यात २६ हजार २३८ असे एकून ३९ हजार ८६० दारिद्रय रेषेखालील नागरिकांना नवीन वीज जोडणी देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
आदिवासी शेतकऱ्यांचा कृषिपंपाकडे कल
गडचिरोली जिल्ह्यात सद्य:स्थितीत १७ हजार १४८ कृषिपंप सुरू आहेत. कृषि संजीवनी योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांचीही संख्या लक्षवेधी असून मागील महिन्यात वीज बिलातील त्रुटी दूर करण्याची मोहीम राबविण्यात आली. यामध्ये तक्रारी दूर झाल्याने १ हजार ७३२ आदिवासी शेतकऱ्यांनी कृषिपंपासाठी अर्ज केले. मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी मंजुरी प्रदान केल्याने ही कामेही लवकरच सुरू होणार आहेत.