विद्यार्जन करणाऱ्या प्राध्यापकांवर उपासमारी
By admin | Published: December 5, 2015 09:07 AM2015-12-05T09:07:10+5:302015-12-05T09:07:10+5:30
मागील १४ वर्षापासून शासनाने सुरू केलेल्या ‘कायम’ विना अनुदानित तत्त्वावरील कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी घेतलेल्या सहविचार सभेत ...
विनावेतन काम : १४ डिसेंबरपासून आमरण उपोषण
चंद्रपूर : मागील १४ वर्षापासून शासनाने सुरू केलेल्या ‘कायम’ विना अनुदानित तत्त्वावरील कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी घेतलेल्या सहविचार सभेत येत्या हिवाळी अधिवेशन काळात १४ डिसेंबरपासून नागपूर येथील पटवर्धन ग्राऊंडवर सामूहिक आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
कायम विना अनुदानित तत्त्वावर वाटण्यात आलेल्या शाळा-महाविद्यालयांच्या खैरातीमुळे शिक्षणाचा प्रसार तर होत आहे. परंतु या महाविद्यालयात कार्य करणाऱ्या प्राध्यापकांचे जीवन मात्र निराशेच्या गर्तेत लोटले गेले आहे. सुशिक्षित बेरोजगारांनी रोजगार व सेवा म्हणून नोकरी स्विकारली खरी; परंतु आज ना उद्या अनुदान प्राप्त होईल, अशी आशा बाळगत त्यांनी आपली सेवा कायम सुरू ठेवली. त्यातच सन २०१३ मध्ये ‘कायम’ शब्द वगळला गेला आणि प्राध्यापकांच्या आशा पल्लवित झाल्या. लगेच मुल्यांकन प्रक्रियासुद्धा पार पडली. त्याचा निर्णय मात्र १ वर्षावरील कार्यकाळ लोटूनही शासनाकडून देण्यात आला नाही. परिणामी हे सोंग कशासाठी, असा प्रश्न या हतबल प्राध्यापकांना पडला आहे. शासनाकडून चालत असलेल्या दिरंगाईमुळे शासनाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक विना अनुदानित कृती समिती शाखा चंद्रपूर, नागपूर विभागातर्फे येत्या १४ डिसेंबरला सामूहिक आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांनी या आंदोलनात बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन म्जिल्हाध्यक्ष प्रा. ए.बी. अलगमकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. एस.यु. कुंभारे, जिल्हा सचिव प्रा. बी.एस. मालेकर, प्रा. प्रकाश लालसरे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)