कंत्राटदारांची देयके थकल्याने कामगारांवर उपासमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:29 AM2021-04-07T04:29:09+5:302021-04-07T04:29:09+5:30
चंद्रपूर: येथील महाऔष्णिक वीज केंद्रामध्ये काम करीत असलेल्या कंत्राटदारांच्या कामाची देयके प्रलंबित आहेत. त्यामुळे कामगारांना वेळेत पगार देणे ...
चंद्रपूर: येथील महाऔष्णिक वीज केंद्रामध्ये काम करीत असलेल्या कंत्राटदारांच्या कामाची देयके प्रलंबित आहेत. त्यामुळे कामगारांना वेळेत पगार देणे आता कंत्राटदारांना अडचणीचे झाले असून, कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे थकीत देयके तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र काॅन्ट्रॅक्टर असोसिएशनने केली असून, चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या मुख्य अभियंत्यांकडे निवेदन दिले आहे.
यापूर्वी केलेल्या कामाची देयके वेळेत दिली जात होती. त्यामुळे कंत्राटदारांकडून कामगारांचे वेतनही दर महिन्याला ठरलेल्या तारखेला देणे शक्य होत होते. मात्र, मागील वर्षभरापासून परिस्थिती बदललेली आहे. कंत्राटदारांनी काम करूनही वेळेत देयके अदा केली जात नाहीत. अल्प प्रमाणात देयके अदा करणे सुरु आहे. याबाबत वीज केंद्राच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, काही कंत्राटदारांनी उसनवारी तसेच घरातील दाग- दागिने विकून कामगारांचे वेतन दिले आहे. मात्र, कामगारांना वेतन देणे आता त्यांनाही अशक्य झाले आहे. कामगारांना वेतन मिळाले नाही तर त्याचा उद्रेक होण्याची भीती असून, त्याचा थेट परिणाम कंत्राटदारांच्या कामावर व पर्यायाने वीज केंद्रावर होणार आहे.
सध्या कोरोना संसर्ग फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा स्थितीत कामगारांना वेठीस धरणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे कंत्राटदारांची थकीत देयके तत्काळ काढण्यात यावीत, अशी मागणी चंद्रपूर वीज केंद्रातील महाराष्ट्र काॅन्ट्रॅक्टर असोसिएशनने केली आहे.