‘त्या’ शिकाऱ्यांना दोन दिवसांची वनकोठडी
By admin | Published: January 24, 2017 12:41 AM2017-01-24T00:41:22+5:302017-01-24T00:41:22+5:30
वनविकास महामंडळ कन्हारगाव वनक्षेत्रातील कुडेसावली नियत बिटांतर्गत असलेल्या शेतशिवारात रानटी डुकरांमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी शेतात इलेक्ट्रीक करंट लावला.
शेतात इलेक्ट्रिक करंट लावणे भोवले : कन्हारगाव वनक्षेत्रातील प्रकार
कोठारी : वनविकास महामंडळ कन्हारगाव वनक्षेत्रातील कुडेसावली नियत बिटांतर्गत असलेल्या शेतशिवारात रानटी डुकरांमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी शेतात इलेक्ट्रीक करंट लावला. त्यात रानटी डुकराचा मृत्यू झाली. सदर प्रकार वनाधिकारी प्रफुल्ल निकोडे यांना समजताच त्यांनी २२ जानेवारीला सापळा रचून चार जणांना अटक केली. चारही जणांना सोमवारी बल्लारपूरच्या न्यायालयात हजर केले असता, २५ जानेवारीपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली.
उमाजी मडावी, बाळू टेकाम, भोगलेश रंगारी, दशरथ गोंधळी व पंकज टेकाम असे आरोपींची नावे असून त्यांची कन्हारगाव वनकोठडीत रवानगी करण्यात आली. शेतातील उभ्या पिकाची नासाडी करणाऱ्या रानटी डुकराच्या हैदोसाने त्रस्त शेतकऱ्यास इलेक्ट्रीक करंट लावणे महागात पडले. यापूर्वी गोंडपिंपरी तालुक्यातील धानापूर येथील शेतशिवारात रानटी डुकरासाठी इलेक्ट्रीक करंट लावण्यात आला होता. त्यात पट्टेदार वाघाचा बळी गेला तर झरण वनक्षेत्रात इलेक्ट्रीक करंटने पट्टेदार वाघाची हत्या करण्यात आली होती.
वीज वितरण कंपनीकडून अशा प्रकारावर आळा घालण्यासाठी योग्य यंत्रणा नाही. तसेच करंटने अपघात झाल्यास इलेक्ट्रीक ट्रीप झाल्याचा मेसेज येत नसल्याची खंत वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. रानटी डुकराच्या किंवा वन्य प्राण्याच्या हैदोसाने शेतपिक नष्ट होत असल्यास त्याची तक्रार करावी. त्याचा मोबदला देण्याचे प्रावधान आहे.
मात्र वन्य प्राण्यांची इलेक्ट्रीक करंटने हत्या करु नये, असे आवाहन विभागीय व्यवस्थापक प्रफुल्ल वाघ यांनी केले आहे. (वार्ताहर)
रानडुकराच्या हल्ल्यात
इसम जखमी
तळोधी (बा.) : येथून नऊ किलोमिटर अंतरावर असलेल्या वाढोणा येथील रविंद्र बुच्चाजी एंगेवार (४९) हा इसम गायमुख जंगलात बकऱ्या चारत असताना रानटी डुकराने त्यांच्यावर हल्ला केला. यात ते जखमी झाले. त्यांना प्राथमिक स्वास्थ्य केंद्र येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून वनविभागाने मौका चौकशी करून जखमी इसमास मदत देण्याची मागणी आहे.