रानटी डुकरांची शिकार, तिघांना अटक
By Admin | Published: July 14, 2016 12:53 AM2016-07-14T00:53:27+5:302016-07-14T00:53:27+5:30
तळोधी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या नेरी-सावरगाव शेतशिवारातील रोडलगत रानटी डुकरांची भरमारने (बंदुक) शिकार करून
दोन जण फरार : नेरी-सावरगाव रोडलगतची घटना
तळोधी (बा.)/नेरी : तळोधी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या नेरी-सावरगाव शेतशिवारातील रोडलगत रानटी डुकरांची भरमारने (बंदुक) शिकार करून मांसाची विल्हेवाट लावण्याच्या बेतात असलेल्या तिघांना वनविभागाच्या चमूने अटक केली. तर दोघे जण फरार होण्यात यशस्वी ठरले. ही कारवाई बुधवारी सकाळी ८ वाजता करण्यात आली.
कन्हैखा सिंग जयसींग भोंड रा. नेरी (५९), गंगाधर गोपाळराव झोडे (४५) रा. सावरगाव व मनोहर लक्ष्मण सुकारे (४१) रा. सावरगाव (माले) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. चिमूरपासून १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या नेरी-सावरगाव शेतशिवारात जंगली डुकराची शिकार होत असल्याची गुप्त माहिती ब्रह्मपुरीचे उपवनसंरक्षक आशीष ठाकरे, सहायक वनसंरक्षक एस.बी. पंधरे यांना मिळली. त्यांनी तळोधी वनपरिक्षेत्राचे आरएफओ ए.एच. सोनटक्के यांना दिली.
या माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी ए.एच. सोनटक्के यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून धाड टाकली. यात घटनास्थळावरच आरोपी डुकराच्या मांसाची विल्हेवाट लावत असताना आढळले. दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले. तर तीन जण सापडले. आरोपींनी चार डुकरांची शिकार केली. यापैकी तीन डुकरांना हलविले होते. घटनास्थळावर एकच डुक्कर वनअधिकाऱ्यांना मिळाले.
तिघांनाही अटक करून त्यांच्याकडून भरमार बंदुक हस्तगत केली. ही कारवाई तळोधीचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए.एच. सोनटक्के यांच्या नेतृत्वात तळोधीचे क्षेत्र सहायक नरड, गोविंदपूरचे क्षेत्र सहाय्यक पी.एम. खोब्रागडे, चिमूरचे क्षेत्र सहायक व्ही.टी. धुर्वे यांनी केली. आरोपींवर वननियम कलम २, ९, ५०, ५१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)