वरोरा तालुक्यात अवकाशातून पडू शकतात ‘बलुन्स’; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2022 11:00 AM2022-11-17T11:00:14+5:302022-11-17T11:06:14+5:30
गृह विभागातर्फे परिपत्रक जारी
प्रवीण खिरटकर
वरोरा (चंद्रपूर) : हैदराबाद येथील एक संशोधक हे काही संशोधन फुगे हे १ नोव्हेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२३ या दरम्यान अवकाशात सोडणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च हैदराबाद या तेलंगना राज्यातील सुनील कुमार हे अवकाशामध्ये १ नोव्हेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२३ यादरम्यान काही संशोधन बलून अवकाशामध्ये सोडणार आहेत. काही कालावधीनंतर हे बलून जमिनीवर पडणार असून वरोरा तालुक्याच्या गावातील हद्दीत किंवा परिसरात हे बलून्स पडण्याची शक्यता राज्याच्या गृह विभागाने वर्तविली आहे. या आशयाचे एक परिपत्रक नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी वरोरा येथे पाठविले असून याबाबत तर्कवितर्क लावले जातात आहे. नागरिकांनी त्या बलून्सला छेडछाड न करण्याचे आवाहनसुद्धा केले आहे. अशा प्रकारचे बलून तालुक्यात कुठे आढळल्यास त्याला स्पर्श न करता तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
कुणीही हात लावू नये
हे बलून नेमके कशाचे आहेत ? ते कोणत्या आकाराचे असतील किंवा ते किती घातक असू शकतात याबाबत कुठलीही स्पष्टता नसल्याने गावामध्ये अनावधानाने त्याला स्पर्श करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र अशा बलुन्सला नागरिकांनी हात लावू नये, असे कळविण्यात आले आहे.