Maharashtra Election 2019; महाराष्ट्रात २४ ऑक्टोबरलाच दीपावली साजरी करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 05:20 PM2019-10-18T17:20:36+5:302019-10-18T17:21:11+5:30
Maharashtra Election 2019; संपूर्ण देशात दीपावली वेगळ्या तारखेला साजरी होणार असली तरी आम्ही २४ ऑक्टोबरलाच साजरी करू, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राजुरा येथील भाजपच्या महाजनादेश संकल्प सभेत शुक्रवारी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्रात पुढची सरकार कुणाची असेल, पुढचा मुख्यमंत्री कोण असेल हे ठरविण्याची वेळ आलेली आहे. एकीकडे नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात देशभक्तांची सेना तर, दुसरीकडे राहुल व शरद पवारांच्या नेतृत्वात परिवारवादी पार्टीचा जमावडा आहे. या निवडणुकीत विदर्भाला विकासाच्या दिशेने नेणाऱ्यांना मते द्यायची की मागे नेणाऱ्यांना हे तुम्हीच ठरवा. मला विश्वास आहे दोन तृतीयांश बहुमताने महाराष्ट्रात भाजपचीच सरकार येणार. संपूर्ण देशात दीपावली वेगळ्या तारखेला साजरी होणार असली तरी आम्ही २४ ऑक्टोबरलाच साजरी करू, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राजुरा येथील भाजपच्या महाजनादेश संकल्प सभेत शुक्रवारी केला.
अमित शाह हे राजुरा विधानसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार संजय धोटे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, खासदार डॉ. विश्वास महात्मे, आमदार रामदास आंबटकर, उमेदवार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, आदिवासी नेते वाघू गेडाम, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अरूण मस्की, चित्रा वाघ अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते.