आदिवासीं समाजाच्या कल्याणासाठी अखेरच्या श्वासापर्यंत काम करेन - सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 10:02 PM2023-10-24T22:02:37+5:302023-10-24T22:03:07+5:30

अखेरच्या श्वासापर्यंत आदिवासींच्या कल्याणासाठी मी काम करणार आहे, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

I will work till my last breath for the welfare of tribal society - Sudhir Mungantiwar | आदिवासीं समाजाच्या कल्याणासाठी अखेरच्या श्वासापर्यंत काम करेन - सुधीर मुनगंटीवार

आदिवासीं समाजाच्या कल्याणासाठी अखेरच्या श्वासापर्यंत काम करेन - सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : गडचिरोलीवर माझे नेहमीच विशेष प्रेम राहिले आहे. कोणत्याही पदावर असलो तरीही त्या पदावर पोहोचण्याचा मार्ग याच जिल्ह्याच्या आशीर्वादाने प्राप्त झाला आहे. त्यामुळे विशेषत्वाने गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासींच्या विकासासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहिलो आहे. एवढेच नाही तर अखेरच्या श्वासापर्यंत आदिवासींच्या कल्याणासाठी मी काम करणार आहे, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.
 
गडचिरोली येथील महाराजा लॉनवर आमदार डॉ. देवराव होळी यांनी आयोजित केलेल्या आदिवासी देवी-देवतांच्या पुजनाचा कार्यक्रम तसेच आदिवासी समाजाच्या मेळाव्याला मुनगंटीवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मुनगंटीवार म्हणाले, ‘मी कॉलेजचा विद्यार्थी असताना लोकसभा निवडणुकीसाठी उभा होतो. त्यावेळी गडचिरोली व मूल विधानसभेने दिलेली आघाडी मी कधीही विसरू शकणार नाही. त्यामुळे या जिल्ह्याने केलेल्या प्रेमाचे व्याज कितीही सेवा केली तरीही फेडू शकणार नाही.’ 

यावेळी गडचिरोली जिल्ह्यासाठी व आदिवासीं समाजासाठी मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने झालेल्या विकासकामांची विशेषत्वाने चर्चा झाली. त्यावर बोलताना  मुनगंटीवार म्हणाले, ‘आदिवासी भागात विद्यापीठ स्थापन करण्याचा विचार पुढे आला त्यावेळी गडचिरोलीचाच पहिला अधिकार असल्याचे मी म्हणालो होतो. कारण इथे विद्यापीठ विकसित झाले आणि इथल्या तरुणांना दर्जेदार शिक्षण मिळाले तर येथील तरुण वाघासारखा पराक्रम करून दाखविल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर गोंडवाना विद्यापीठाला मान्यता देण्यात आली.’ 

चिचडोह व कोडगल प्रकल्पाचे रखडलेले कामही पूर्णत्वास नेण्याची संधी मिळाल्याचे समाधान मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. राज्याच्या अर्थसंकल्पात आदिवासी बांधवांसाठी आरक्षित असलेला निधी ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचतच नव्हता. त्यानंतर पाच टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना देण्याचा निर्णय आम्ही केला, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणारे वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने डाक तिकीट काढण्याची संधी प्राप्त झाल्याचेही ते म्हणाले. 

मुनगंटीवार स्वागताने भारावले
सुधीर मुनगंटीवार यांचे गडचिरोली जिल्‍हयात जल्लोषात स्‍वागत करण्‍यात आले. आदिवासी समाजाच्‍या मेळाव्‍यासाठी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या निमंत्रणावरून मुनगंटीवार गडचिरोलीमध्‍ये आले होते. यावेळी ठिकठिकाणी आदिवासींच्या परंपरेनुसार त्यांचे उत्‍स्‍फूर्त स्‍वागत करण्‍यात आले. जिप्‍सीमध्‍ये त्‍यांची भव्‍य मिरवणूक काढण्‍यात आली. तसेच काही ठिकाणी जेसीबीद्वारे पुष्‍पवृष्‍टी करण्‍यात आली. रॅलीमध्‍ये मुनगंटीवार यांच्या स्वागतासाठी आदिवासी, गोंडी बांधवांकडून ढेमसा नृत्‍य सादर करण्‍यात आले. या सर्व सत्‍काराने मुनगंटीवार भारावले. 

आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण
‘आदिवासी आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थी शिकतो, पण या आश्रमशाळा इतरांकडून चालविल्या जातात. या विद्यार्थ्यांच्या पंखात बळ निर्माण करण्यात आपण कमी पडत असल्याचे लक्षात आले. राज्य सरकार निधी खर्च करतेय, पण ज्या वेगाने आदिवासी विद्यार्थ्याची प्रगती व्हायला हवी पण ती होत नव्हती. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत अडकवून चालणार नाही, त्यांना नामवंत शाळेतच शिकवावे लागेल, यासाठी राज्य सरकारने निर्णय केला. आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाचा हक्क प्राप्त करून देण्याचे सौभाग्य मला लाभले,’ असेही मुनगंटीवार म्हणाले. 

Web Title: I will work till my last breath for the welfare of tribal society - Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.