चिन्ह मिळाले; आता रणधुमाळी सुरू

By admin | Published: April 9, 2017 12:38 AM2017-04-09T00:38:22+5:302017-04-09T00:38:22+5:30

चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक आता केवळ दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. मागच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत प्रभागाचा पसाराही वाढला आहे.

Icon received; Now start the ringtone | चिन्ह मिळाले; आता रणधुमाळी सुरू

चिन्ह मिळाले; आता रणधुमाळी सुरू

Next

ध्वनीक्षेपकांचीही धूम : बॅनर, फ्लेक्सने गजबजणार शहर, मतदारांपर्यंत पोहचताना उमेदवारांची दमछाक
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक आता केवळ दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. मागच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत प्रभागाचा पसाराही वाढला आहे. त्यामुळे कमी वेळात प्रत्येक मतदारापर्यंत पोहचताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी तब्बल ४० उमेदवारांनी रणांगण सोडले. आज शनिवारी उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे उद्या रविवारपासून प्रचाराच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.
महानगरपालिका निवडणुकीमुळे आता चंद्रपुरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रत्येक प्रभागात, चौकाचौकात, पानटपऱ्यावर निवडणुकीचीच चर्चा रंगू लागली आहे. हा उमेदवार निघणार, त्या उमेदवाराची जमानत जप्त होणार, अशा चर्चा मतदारांमध्ये मोठ्या चवीने चर्चिल्या जात आहे. येत्या १९ एप्रिलला मनपा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. प्रचारासाठी उमेदवारांना केवळ आता दहाच दिवस मिळणार असल्याने उमेदवारांची झोप उडाली आहे. ३ एप्रिलला नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ५२७ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. त्यानंतरच्या छाननीत काही उमेदवारांचे नामांकन अपात्र ठरविण्यात आल्यानंतर शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता. या दिवशी सकाळपासूनच निवडणूक प्रक्रियेसाठी तयार करण्यात आलेल्या झोन कार्यालयात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या नोंदी घेतल्या जात होत्या.
प्रारंभी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेत नामांकन अर्ज दाखल करणाऱ्या तब्बल ४० उमेदवारांनी ऐनवेळी आपले नामांकन परत घेतले. आता ६६ जागांसाठी ४६० उमेदवार रिंगणात आहेत. यंदाची मनपा निवडणूक सर्वच पक्षाने प्रतिष्ठेची केली आहे. भाजप-सेनेची युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी फिस्कटल्याने सर्वच पक्ष सर्व ताकदीनिशी निवडणुकीसाठी उभे ठाकले आहेत.
भाजपाने सर्व ६६ जागांवर उमेदवार उभे केले. काँगे्रसने बंगाली कँप प्रभागातील महिला गटातील उमेदवार वगळता ६५ जागांवर उमेदवार उतरविले. राष्ट्रवादी काँग्रेसने ३१, शिवसेनेने ६१ तर मनसेने १७ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका उमेदवाराने आपले नामांकन परत घेतले. त्यामुळे राष्ट्रवादीचे केवळ ३० उमेदवार रिंगणात आहेत. विदर्भ माझा पार्टीचे ८ उमेदवार उभे केले आहेत. प्रहार संघटनेचे चार, रिपब्लिकन नगर विकास आघाडीचे २५, भारिप बहुजन महासंघाचे १५, मनसेचे १७ उमेदवार रिंगणात आहेत.
आज शनिवारी निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या शहरातील पाचही झोन कार्यालयात उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले. सकाळी १० वाजतापासून ही प्रक्रिया सुरू झाली. सायंकाळपर्यंत झोन कार्यालयात चिन्हाचे वाटप सुरूच होते. काँग्रेस, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे या पक्षांच्या उमेदवारांना त्यांच्या पक्षाचे बोधचिन्ह देण्यात आले. तर उर्वरित पक्ष, संघटना व अपक्ष उमेदवारांना कपबशी, शिलाई मशीन, रोडरोलर, टिव्ही संच आदी निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)

आचार संहितेचे उल्लघंन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार
चंद्रपूर: महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली असून या समितीचा आढावा शुक्रवारी घेण्यात आला. बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, मनपा आयुक्त संजय काकडे, उपायुक्त विजय देवळीकर, तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. निवडणूक काळात आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास अशा व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. संनियंत्रण समितीने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे, मतदारांवर प्रभाव टाकण्याकरिता देण्यात येणाऱ्या वस्तूंच्या वाटपावर अंकुश ठेवणे, उमेदवार व राजकीय पक्षाच्या खर्चाची माहिती सादर करणे, रोख रक्कमांच्या ने-आणीवर लक्ष ठेवणे, बँकामार्फत होणाऱ्या मोठ्या संशयास्पद आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवणे, पेड न्यूज, पेड सोशल कमिटी, सोशल मिडिया व इंटरनेटवर लक्ष केंद्रीत करणे याबाबत आढावा घेण्यात आला. या कामाकरिता ७ एसएसटी पथक, १४ एफएसटी पथक गठीत करण्यात आले असून, प्रत्येक टिमसोबत व्हीडीओ कॅमेरे व वाहन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच शहरातील अवैध दारु, रोख रक्कम इतर संशयास्पद वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता सात नाके उभारण्यात आले असून तिथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहे व तेथून २४ तास शहरात येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. तसेच केलेल्या कार्यवाहीचा दैनंदिन अहवाल निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस विभागाकडे वेळावेळी सादर करण्याचे सूचना देण्यात आल्या. तसेच कामा संदर्भात काही अडचणी असल्यास महानगरपालिका निवडणूक अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी सतत संपर्क साधण्याच्या सूचना दिल्यात.

पोलिसांचे आॅपरेशन आॅल आऊट
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने आॅपरेशन आॅल आऊट सुरू केले आहे. सुमारे ८०० कर्मचारी, ७० अधिकारी व ६० वाहनांचा ताफा यासाठी सज्ज करण्यात आला आहे. या मोहिमेला आज पोलीस मुख्यालयातून सुरुवात करण्यात आली. यासोबतच व्हीडीओग्राफी सर्व्हेलियन्स पथक, भरारी पथक, चेकपोस्ट पथक, तक्रार निवारण कक्षासाठी आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील जेवणाचे धाबे, हॉटेल्स यांच्यावरही करडी नजर ठेवण्यात येणार आहे. अवैध दारू रोखण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर नजर ठेवली जाणार आहे. पथकात नेमलेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी कर्तव्यावर दक्ष राहून कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेले आहे.
मागितला टीव्ही; मिळाली कपबशी
या निवडणुकीत प्रथमच विदर्भ माझा पार्टी रिंगणात उतरली आहे. या पार्टीचे आठ उमेदवार मैदानात आहेत. शासनमान्य पक्ष असल्याने अकोला मनपा निवडणुकीप्रमाणे आमच्या पक्षाच्या सर्व उमेदवारांना ‘टिव्ही संच’ हेच चिन्ह देण्यात यावे, अशी मागणी पंधरा दिवसांपूर्वीच या पक्षाने आयुक्तांकडे केली होती. मात्र त्यांची ही मागणी पूर्ण झाली नाही. त्यांच्या उमेदवारांना आज कपबशी हे चिन्ह मिळाले.
निवडणूक निरीक्षक चंद्रपुरात
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता नेमण्यात आलेले एक मुख्य निवडणूक निरीक्षक व दोन निवडणूक निरीक्षक आज शनिवारी चंदपुरात दाखल झाले. मनपा निवडणूक कामाचा व निवडणूक प्रक्रियेचा पूर्ण आढावा घेतला. त्यांनी पाचही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांना भेटी दिल्या. नामनिर्देशनपत्र ांबंधातील संपूर्ण कार्यवाही, छाननी, तक्रार निवारण याचीही त्यांनी माहिती घेतली. तसेच आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीचाही त्यांनी आढावा घेतला. संशयास्पद मतदान केंद्राना भेटी देण्यात आल्या. तक्रार निवारण कक्षाचाही आढावा घेण्यात आला. मतदान जनजागृती कामाचा आढावा घेतला. ईव्हीएम मशिनबाबत चर्चा करण्यात आली. त्याच बरोबर संनियत्रण समितीच्या कामाचा आढावा, पेडन्युज आढावा घेण्यात आला.

Web Title: Icon received; Now start the ringtone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.