बांबू उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून चंद्रपूरची ओळख बनवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 11:30 PM2018-04-08T23:30:25+5:302018-04-08T23:30:25+5:30
चंद्रपूरच्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राने (बीआरटीसी) गेल्या दोन वर्षात अतिशय गतीने कामे सुरु केली आहे. बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याच्या कार्यशाळा तसेच प्रशिक्षण शिबिर या माध्यमातून मोठा प्रशिक्षीत वर्ग जिल्ह्यात तयार होत असून रोजगारयुक्त जिल्ह्याकडे वाटचाल सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूरच्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राने (बीआरटीसी) गेल्या दोन वर्षात अतिशय गतीने कामे सुरु केली आहे. बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याच्या कार्यशाळा तसेच प्रशिक्षण शिबिर या माध्यमातून मोठा प्रशिक्षीत वर्ग जिल्ह्यात तयार होत असून रोजगारयुक्त जिल्ह्याकडे वाटचाल सुरू आहे. भविष्यात बांबूपासून वस्तू बनविणारे शहर म्हणून चंद्रपूरची ओळख निर्माण करा, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या मुख्य वनसरंक्षक कार्यालयाजवळील वन धन जन धन वस्तू विक्री केंद्राच्या अत्याधुनिक दालनाचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा उपस्थित होते. ना. सावरा यांना ना. मुनगंटीवार यांनी कलाकुसरेचा टेबल लॅम्प भेट म्हणून दिला. यावेळी आ. नाना श्यामकुळे, आ. अॅड.संजय धोटे, महापौर अंजली घोटेकर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा, मनपा सभापती राहुल पावडे, पोभूर्णाच्या सभापती अल्का आत्राम, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, बांबू प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील, वनअकादमीचे संचालक अशोक खडसे, विभागीय वनअधिकारी अशोक सोनकुसरे आदींची उपस्थिती होती.
कुठल्याही अद्ययावत विक्री केंद्राला शोभेल अशा या केंद्रामध्ये बांबूपासून तयार करण्यात आलेल्या विविध आकर्षक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये तिरंगा, बांबूची सायकल, तलवार, समई, आकाश दिवा तसेच अनेक शोभेच्या वस्तू या ठिकाणी विक्री व प्रदर्शनासाठी मांडण्यात आल्या आहेत. चंद्रपूरमध्ये येणाऱ्या पर्यटक आणि पाहुण्यांना चंद्रपूरचे वैशिष्ट्य व वेगळेपणा दाखविण्यासाठी हे केंद्र आकर्षण ठरणार आहे. बांबूपासून बनलेल्या अभिनव भेट वस्तूंनी सज्ज केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर रेंजर कॉलेज भागातील बांबू हॅन्डीक्राफ्ट अॅड आर्ट युनिट (भाऊ) या निर्मिती आणि सामूहिक उपयोगिता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
या ठिकाणी बांबूपासून विविध वस्तू बनविण्यासाठी आवश्यक असणाºया आधुनिक मशिन लावण्यात आल्या आहेत. महिला बचत गटांना या ठिकाणी प्रशिक्षण दिले जात असून चंद्रपूरनंतर विसापूर, मूल, पोंभूर्णा, जिवती, नागभीड, चिमूर या भागात सामूहिक उपयोगिता केंद्र लवकरच निर्माण होणार आहे. यावेळी बीआरटीसीचे संचालक राहुल पाटील व महिला आर्थिक विकास मंडळाचे जिल्हा समन्वयक नरेश उगेमुगे यांच्यामध्ये सामज्यस्य करारावर स्वाक्षरी झाली. या माध्यमातून १ हजार महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.