उपोषणकर्त्यांचे काही झाल्यास वेकोलि अधिकारी जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2017 12:36 AM2017-02-06T00:36:54+5:302017-02-06T00:36:54+5:30
बल्लारपूर वेकोलि क्षेत्रातील प्रकल्पग्र्रस्तांनी वेकोलिच्या धोरणाविरोधात येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.
प्रकल्पग्रस्तांचे उपोषण : ठाणेदारांचे वेकोलिला पत्र
राजुरा: बल्लारपूर वेकोलि क्षेत्रातील प्रकल्पग्र्रस्तांनी वेकोलिच्या धोरणाविरोधात येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. आज चवथ्या दिवशीही उपोषण सुरूच असून उपोषणकर्त्याना काही झाल्यास व अनुचित प्रकार घडल्यास वेकोलिच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, अशा आशयाचे पत्र ठाणेदार मल्लीकार्जुन इंगळे यांनी वेकोलिला पाठविले आहे.
बल्लारपूर क्षेत्रातील धोपटाळा, सास्ती, भंडागपूर, कोलगाव, मानोली या क्षेत्रातील शेतीवर सर्व प्रकारचे सेक्शन लावूनसुद्धा शेतकऱ्यांना नोकरी आणि शेतीचा मोबदला देण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई करुन शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे. वारंवार वेकोलि प्रशासनाला निवेदन देऊनही पाच वर्षापासून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या वेकोलि अधिकाऱ्यांना विरोधात विना घटे (२९), राजू मोहारे (३१) सोनु गाडगे (३०), बाळू जुलमे (३२) बालाजी पिंपळकर (३१), रविंद्र बोबडे (३५), पुष्पा बुधवारे (५८) मुर्लीधर फटाले (५०) हे आमरण उपोषणाला बसले असून तीन दिवसापासून अन्न त्याग आंदोलन करीत आहेत. त्यांच्या समर्थनार्थ २०० महिला -पुरुष आंदोलनात सहभागी झाले आहे.
आमरण उपोषणादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास वेकोलिच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असे पत्र राजुराचे ठाणेदार मल्लीकार्जुन इंगळे यांनी वेकोलिचे उप-महाप्रबंधक एम. एलय्या, नियोजन अधिकारी मनोज नवले यांना दिले. (शहर प्रतिनिधी)
पाच तास मिटिंग; मात्र निर्णय नाही
राजुरा येथील उपविभागीय अधिकारी डॉ. एम. दयानिधी यांच्या दालनात पाच तास मिटिंग झाली. या मिटींगला राजुराचे तहसीलदार धर्मेश फुसाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख, राजुराचे ठाणेदार मल्लीकार्जन इंगळे, वेकोलिचे उपमहाप्रबंधक एम. येलय्या, नियोजन अधिकारी मनोज नवले, प्रकल्पग्रस्ताचे प्रतिनिधी विजय चन्ने, जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, राजुरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. बी. यू. बोर्डेवार, लोकमतचे तालुका प्रतिनिधी आनंद भेंडे, प्रविण देशकर उपस्थित होते. वेकोलिच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे मार्ग निघू शकला नाही. सर्व अधिकाऱ्यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी एम. दयानिधी यांनी वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की शेतकऱ्यांवर अन्याय होत असून वेळीच दखल घ्या, वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचरण करा, उपोषणकर्त्याला काही झाल्यास वेकोलिचे अधिकारी जबाबदार राहील.
चवथ्या दिवशीही उपोषण सुरुच
उपोषणाच्या चवथ्या दिवशीसुद्धा आमरण उपोषण सुरुच आहे. ८७१ हेक्टर जमीन वेकोलिने घेतल्या. एक हजार ८० नोकऱ्या व त्यावर आधारित पाच हजार नागरिकांचा प्रश्न असून अधिकारी तळमळीने मदत करीत आहे. मात्र वेकोलिचे अधिकारी मात्र सुस्त दिसत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोलण्याची मुभा नाही. कोळसा मंत्रालयाच्या कार्यप्रणालीमुळे शेतकऱ्यांवर मरण्याची पाळी येत असल्याचा संतप्त भावना शेतकरी व्यक्त करीत आहे.