चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर न झाल्यास आंदोलन
By admin | Published: November 23, 2015 01:05 AM2015-11-23T01:05:30+5:302015-11-23T01:05:30+5:30
ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रांतर्गत सावली, सिंदेवाही व ब्रह्मपुरी तालुक्यातील सुमारे ८० गावामध्ये असलेल्या हजारो एकर शेताची प्रत्यक्ष पाहणी केली ...
विजय वडेट्टीवार : सावली, सिंदेवाही तालुक्यातील शेतीची प्रत्यक्ष पाहणी
चंद्रपूर : ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रांतर्गत सावली, सिंदेवाही व ब्रह्मपुरी तालुक्यातील सुमारे ८० गावामध्ये असलेल्या हजारो एकर शेताची प्रत्यक्ष पाहणी केली असता पाण्याअभावी हजारो एकर क्षेत्रातील संपूर्ण धान पिके नष्ट झाली असून तूर पिकासह अनेक पिके उद्ध्वस्त झाली आहे. महसूल, कृषी, ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करुन दुष्काळाबाबतचा अहवाल शासनाकडे पाठवावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेस पक्षाचे उपगट नेता तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झालेला असून शेतकऱ्यांसह त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येणार असल्याचे चित्र दिसत आहे. असे असले, तरी प्रशासनातील एकही अधिकारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर गेलाच नसल्यामुळे पिकांची पैसेवारी कागदोपत्री तयार करण्यात आली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे किती गावे दुष्काळग्रस्त जाहीर होईल आणि किती गावांना दुष्काळग्रस्त यादीचा फायदा मिळेल यात शंका निर्माण झाली आहे. ९० टक्के पीक नष्ट झाले असतानासुद्धा याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
आ. वडेट्टीवार यांनी गेल्या चार दिवसांपासून ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली तालुक्यातील शेकडो गावातील शेतीची पाहणी केली. तसेच २० नोव्हेंबर रोजी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत सावली व सिंदेवाही तालुक्यातील सावली, अंतरगाव, निफंद्रा, डोंगरगाव, चिखली, मुडझा, बोरमाळा, गेवरा बुज. गेवरा खुर्द, कसरगाव, पाथरी, पालेबारसा, मेहाबुज, चिकमारा, गुंजेवाही, सिंदेवाही यासह ७० ते ८० गावातील अंदाजे १५ हजार एकर शेतीची पाहणी केली. त्याच्यासोबत यावेळेस तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राजेश सिद्धम, जिल्हा परिषद सदस्य दिनेश चिटनुरवार, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती युवराज शेरकी पंचायत समितीचे सदस्य, सरपंच, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळेस एका शेतकरी महिलेने आपल्या शेतातील पीक पाण्याअभावी नष्ट होऊन तणीस झाले असल्याचे सांगून प्रत्यक्ष शेतातील धान पिकाची झालेली तणीस हातात घेऊन दाखविलीे. पाण्याअभावी शेतामध्ये दुबार व तिबार पेरणी करावी लागली. परंतु नंतर पाऊसच आलेला नसल्यामुळे शेतातील उभे पीक नष्ट झाल्यामुळे हजारो एकर शेती पडीत आहे.
काही ठिकाणी अखेर लागणारे पाणी न मिळाल्यामुळे हातचे येणारे थोडेबहुत पीक नष्ट झाले. काही शेतीमध्ये धानाचे पीक नसल्यामुळे जनावरे व बकऱ्या शेतात चरताना दिसले. शेतातील पिकाच्या उत्पन्नावरच आमच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह असल्यामुळे आता पीकच नसल्याने आमच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येणार आहे. मुलांचे शिक्षण कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाळीव जनावरांना पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे नदीवर सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन वेळात पाण्यासाठी न्यावे लागत आहे. जनावरांना चारा आणि पिण्याचे पाणी याबाबत गंभीर परिस्थिती निर्माण होणार असल्याचे या परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या आपबितीत सांगितले. तसेच पिकाची पाहणी करण्यासाठी कोणतेच अधिकारी व कर्मचारी शेतावर आले नसल्याचेही शेतकऱ्यांनी आ. वडेट्टीवार यांच्याशी बोलताना सांगितले. शेतीमध्ये धानाचे पीक नसल्यामुळे जनावरे व बकऱ्या शेतात चरताना दिसले. या परिसरातील प्रत्यक्ष पाहणी केली असता ९० ते ९५ टक्के धान, सोयाबिन, तूर यासह अनेक पिके नष्ट झालेली दिसून आलेली आहे. गावात रोजगाराचे साधन नसल्यामुळे रोजगारासाठी हजारो शेतकऱ्यांचे कुटुंब बाहेरगावी स्थलांतरित होत असल्याचे दिसून आले आहे.
त्यामुळे तातडीने महसूल, कृषी, ग्रामविकास विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जावून पाहणी करावी आणि दुष्काळाबाबतचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात यावा. तसेच ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही या तालुक्यातील सर्व गावासह चंद्रपूर जिल्हाच दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी आ. विजय वडेट्टीवार यांनी शासनाकडे केली आहे. तसेच नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीतसुद्धा वडेट्टीवार यांनी ही मागणी लावून धरली होती, हे येथे उल्लेखनीय. (शहर प्रतिनिधी)