जड वाहतूक बंद झाल्यास शहर व्याप्तीसोबत रोजगार निर्मितीही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:30 AM2021-09-22T04:30:48+5:302021-09-22T04:30:48+5:30
नागभीड : सध्या नागभीड येथे शहरातील जड वाहतुकीचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आहे. शहरातील जड वाहतूक बंद करण्यात आल्यास शहरात ...
नागभीड : सध्या नागभीड येथे शहरातील जड वाहतुकीचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आहे. शहरातील जड वाहतूक बंद करण्यात आल्यास शहरात रोजगार निर्मितीसोबतच शहर व्याप्तीस मोठा हातभार लागू शकतो, अशा प्रतिक्रिया यासंदर्भात व्यक्त होत आहेत. मात्र, या ठरावाच्या अंमलबजावणीसाठी नगर परिषदेने सकारात्मक होणे गरजेचे आहे.
नागभीड आता ग्रामपंचायत राहिली नाही. सहा वर्षांपूर्वीच या ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर झाले आहे. म्हणूनच १४ सप्टेंबर २०१८ रोजी नगर परिषदेच्या कार्यकारी मंडळाने शहरातील जड वाहतूक बंद करण्याचा ठराव पारित केला होता. मात्र, या ठरावाची अंमलबजावणी अद्याप करण्यात आली नाही. आज नागभीडच्या कोणत्याही रस्त्याची क्षमता शहरातून होत असलेली जड वाहतूक पेलवण्याइतपत नाही. काही ठिकाणी अतिक्रमणाने रस्तेच गिळंकृत करून टाकले आहेत. काही रस्त्यांवर तर जड वाहने जाऊ द्या, अगदी दोन छोटी वाहने समोरासमोर आली तरी वाहतुकीची कोंडी निर्माण होते.
शहरातून होणारी जड वाहतूक बंद झाली तर येथील व्यापाऱ्यांचा त्रास होणार आहे हे निश्चित, पण यामुळे शहर व्याप्तीस आणि शहरातील रोजगार निर्मितीस हातभार लागणार आहे. शहरातील जड वाहतूक बंद झाल्यास व्यापाऱ्यांना मालाच्या साठवणुकीसाठी गोदामांची गरज भासणार आहे. हे गोदाम शहराबाहेरच बांधावे लागणार. शहराबाहेर गोदाम झाले तर हळूहळू त्या परिसरात वसाहतीसाठी लेआऊट पडून घरांचीही निर्मिती होणार आहे. या गोदामांमधून दुकानांमध्ये मालवाहतूक करण्यासाठी अनेक मध्यम, छोटी वाहने लागणार आहेत. यातून अनेकांना रोजगार प्राप्त होऊ शकतो. मात्र, यासाठी घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी होण्याची गरज आहे.
210921\img-20210915-wa0014.jpg
नगर परिषद इमारतीचा फोटो