कोई हमसे जित ना पावे, चले चलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 11:08 PM2019-08-04T23:08:10+5:302019-08-04T23:09:08+5:30
सुप्रसिद्ध अभिनेता ‘द परफेक्शनिस्ट’ आमिर खान येणार, हे कळल्यावर हजारोंच्या संख्येने तरुण-तरुणी बल्लारपूरच्या एफडीसीएमच्या मैदानावर जमा झाले होते. आमिर खानला यायला विलंब झाला. तरीही तब्बल दीड तास ही तरुणाई आमिर खानची एक झलक पाहण्यासाठी तिथून हलली नाही. अखेर आमिर खान आला आणि अगदी मराठीतून भाषणाला सुरुवात करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : सुप्रसिद्ध अभिनेता ‘द परफेक्शनिस्ट’ आमिर खान येणार, हे कळल्यावर हजारोंच्या संख्येने तरुण-तरुणी बल्लारपूरच्या एफडीसीएमच्या मैदानावर जमा झाले होते. आमिर खानला यायला विलंब झाला. तरीही तब्बल दीड तास ही तरुणाई आमिर खानची एक झलक पाहण्यासाठी तिथून हलली नाही. अखेर आमिर खान आला आणि अगदी मराठीतून भाषणाला सुरुवात करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. औचित्य होते, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने सुरू होणाऱ्या मिशन शक्तीच्या शुभारंभाचा. मिशन शक्तीमुळे अभिनेता आमिर खान यांनाही आपले विद्यार्थी जीवन आठवले. या आठवणी त्यांनी तरुणाईसोबत ‘शेयर’ केल्या. आमिरने लगान चित्रपटातील ‘कोई हमसे जीत न पावे’ या ओळी गायिल्या. पुढच्या ओळी त्याला आठवेना, तेव्हा विद्यार्थ्यांमधून काही विद्यार्थ्यांनी पुढील ओळी त्यांना आठवून दिल्या व मिशन शक्तीतून आपण पदक मिळविणारच असा आत्मविश्वास दाखविला.
बल्लारपूर येथे मिशन शक्तीचे उद्घाटन त्यांचे हस्ते झाले. याप्रसंगी आमिर खान आपल्या विद्यार्थी जीवनातील आठवण सांगत म्हणाले, मी शाळा- कॉलेजमध्ये असताना माझे अभ्यासापेक्षा विविध खेळप्रकारांमध्येच रुची होती. अभ्यासाचा कंटाळा यायचा तर खेळांमध्ये खूप रमायचो. खेळांचा मला पुढील जीवनात बराच फायदा झाला. शाळांमध्ये शिकविल्या जाणाºया भाषा, गणित, विज्ञान या विषयांइतकेच खेळालाही महत्त्व देण्यात यावे, असे त्यांनी सूचविले. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने या भागात भव्य आणि सर्व सुविधायुक्त क्रीडांगण तयार करण्यात आले आहे. मिशन शक्ती हा उपक्रम राबविला जात आहे. त्यामुळे, या क्षेत्रातून आॅलिम्पिक गाजवू शकणारे उत्कृष्ट खेळाडू नक्कीच तयार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला व या मिशनला भरभरुन शुभेच्छा दिल्या. खेळ एकेरी असो की सांघिक, खेळाडूंना त्यातून प्रचंड ऊर्जा व बळ मिळते. आत्मविश्वास बळावतो. मनात जिंकण्याची जिद्द निर्माण होते. टीम वर्क, हार्ड वर्क शिकवण मनात रुजून त्यापासून खेळाडूंचे व्यक्तिमत्व घडते आणि फुलते. माझेही व्यक्तिमत्व विविध खेळ खेळण्यातूनच विकसित होत ते बहरले आहे, असेही आमिर खान यांनी यावेळी आवर्जुन सांगितले. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता आमिर खान चंद्रपुरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात जलशक्ती कार्यशाळेला उपस्थित राहून संबोधित करणार होते.
त्यामुळे चंद्रपुरातील या सभागृहाच्या चारही बाजुंनी एकच गर्दी उसळली होती.
एव्हरेस्टवीरांचा सत्कार
या कार्यक्रमांमध्ये चंद्रपूरची शान असणारे एव्हरेस्टवीर मनिषा धुर्वे, उमाकांत मडावी, प्रमेश आडे, कविदास काठमोडे, इंदू कन्नाके, अंतू बाई कोटनाके, सुरज आडे यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळणारे विनोद निखाडे, अनिल पचगाडे, प्रकाश तुमाने ,आतिश दुर्वे, वैभव नायडू, निशांत गर्गे, सोनी जयस्वाल, प्रशती कतले, चैताली किनाके, पूर्वा खेरकर यांचाही सत्कार करण्यात आला.
क्रीडा-कला क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार
हौशी नाट्य स्पर्धेमध्ये महाराष्ट्रात धूम करणाऱ्या ‘नथिंग टू से’ या नाटकाच्या संपूर्ण टीमचे यावेळी आमिर खान यांच्या हस्ते कौतुक करण्यात आले. डॉ.जयश्री कापसे गावंडे, बकुळ धवणे, नूतन धवणे, जयंत वंजारी, हेमंत गुहे, तेजराज चिकटवार, पंकज नवघरे, अंकुश राजुरकर, आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला.
क्षणचित्रे
आमिरखान यांनी भाषणाची सुुरुवात मराठीतून केली.
जेईई परीक्षेत देशातून पहिला आलेल्या बल्लारपूर येथील कार्तिकेय गुप्ता याला पुरस्कृत केल्यानंतर आमिरने स्वत:च्या मोबाईलवर कार्तिकेयसोबत सेल्फी घेतली.
मोठ्या आसनक्षमतेचे सभा मंडप खचाखच भरले होते. बरेच जणांना बाहेर उभे राहून भाषण ऐकावे लागले.
आमिर खानला बघताच तरुणाईच्या चेहऱ्यावर जिंकल्याचा भाव होता.
मिशन शक्तीतून मुले घालणार पदकांना गवसणी-सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर : २०२४ च्या आॅलम्पिकमध्ये देशाचे, राज्याचे प्रतिनिधित्व करताना चंद्रपूर - गडचिरोलीचे जिगरबाज मुले निश्चितच पदकांना गवसणी घालतील. मिशन शौर्यतून अवघ्या महाराष्ट्राला ही झलक पाहायला मिळाली आहे. मिशन शक्तीमधून आमचा संकल्प निश्चित आहे. त्यावर मोहोर लागेल, असे आशावादी प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. सुप्रसिद्ध सिनेअभिनेते आमिर खान यांच्या उपस्थितीत त्यांनी राज्यव्यापी मिशन शक्तीचा शुभारंभ केला.तत्पूर्वी, विसापूर जवळील स्टेडियमचे उदघाटन करण्यात आले. तरुणाईच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या आमिर खान या कार्यक्रमाला उपस्थित असल्याने मोठया संख्येने जिल्हाभरातून नागरिक उपस्थित झाले होते. यावेळी त्यांनी आमिर खान यांनी आपल्या चित्रपटातून कायम समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. आमिर खानचे चित्रपट केवळ मनोरंजनाचे नसतात तर त्यातून समाजाला एक सुप्त संदेश दिला जातो. त्याचमुळे त्यांना आज आम्ही या ठिकाणी पाचारण केले असून आज त्यांच्या साक्षीने आम्ही आॅलिम्पिक जिंकण्याची तयारी सुरू केली आहे. हे आम्हाला सांगायचे आहे,असे त्यांनी तरुणांना आवाहन केले. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील तरुण हे आवाहन पेलू शकतात. याची खात्री आम्हाला मिशन शौर्यमध्ये झाली. ज्या मुलांनी कधी विमान बघितले नाही त्या मुलांनी विमानाच्या उंचीवर असणाºया एव्हरेस्टला गवसणी घातली, त्यांच्यासाठी उत्तम क्रीडा सुविधा आम्ही उपलब्ध करीत आहोत. चंद्रपूर व परिसरातील विद्यार्थ्यांचा यूपीएससी, एमपीएससी परीक्षेमध्ये टक्का वाढावा यासाठी मिशन सेवेला सुरुवात केली आहे. अनेक मुलांना यश येत आहे. आता तर आयआयटीच्या प्रवेश परीक्षेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मुलगा अवघ्या देशात पहिला आला आहे. विसापूर जवळ नुकतीच आम्ही सैनिकी शाळा सुरू केली आहे. या सैनिकी शाळेतील विद्यार्थी पुढे जाऊन देश सेवा करणार आहेत. मला आनंद होईल की, जेव्हा नेव्ही आर्मी, एअरफोर्समध्ये उच्च अधिकारी सांगतील की, होय मी चंद्रपूरच्या सैनिकी शाळेचा विद्यार्थी आहे, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.यावेळी चंद्रपूरच्या युवा शक्तीचा परिचय करून देताना ना. मुनगंटीवार म्हणाले, आमिर खान यांनी हे जाणून घ्यावे की, या चंद्रपूरच्या कोळशाच्या खाणीमध्ये अनेक सिक्रेट स्टार त्यांच्या पुढे बसलेले आहेत. त्यांच्यातील हिऱ्यांना पैलू पाडण्यासाठी आपल्याला बोलवले आहे. आपण अतिशय उत्तम, असे चित्रपट निर्माण करता. समाजातील छोटया छोटया बाबींचे संशोधन करता. आपल्यातील संशोधकांचे मार्गदर्शन या ठिकाणी विद्यार्थ्यांना लाभावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.