प्रवाशाने मास्क न लावल्यास वाहनचालकालाही दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 05:12 PM2021-12-08T17:12:40+5:302021-12-08T17:19:10+5:30
विनामास्क प्रवास करणारा प्रवासी ज्या वाहनातून प्रवास करीत असेल त्या वाहनचालकांवर दंड थोपाटण्यात येणार आहे. त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांवर चाप बसणार आहे.
चंद्रपूर : कोरोनाची लाट ओसरताच शासनाने सर्व निर्बंध उठविले. मात्र, आता ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्याने शासनाने कठोेर निर्बंध लागू केले आहे. त्यानुसार प्रवाशाने मास्क घातला नसेल तर संबंधित वाहनचालकावरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे ॲटोचालक, रिक्षाचालक, खासगी बस अशा वाहनचालकांना विनामास्क प्रवासी घेणे महागात पडण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या संकटाने संपूर्ण जगच त्रस्त झाले आहे. सलग तिसऱ्या वर्षीही कोरोनाने डोके वर काढले आहे. आता आलेल्या नव्या ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे. त्यामुळे त्याला वेळीच आळा घालण्यासाठी शासनाने नवे कठोर निर्बंध लागू केले आहे. त्यामुळे आता विनामास्क फिरणे कठीण झाले आहे. तसेच विनामास्क प्रवास करणारा प्रवासी ज्या वाहनातून प्रवास करीत असेल त्या वाहनचालकांवर दंड थोपाटण्यात येणार आहे. त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांवर चाप बसणार आहे.
जिल्ह्यातील एकूण प्रवासी वाहने
टुरिस्ट कॅब - १३१३
ॲटोरिक्षा ८९१०
बस १३४०
जीप ८३६८
मोटार कार ३९९००
मनपातर्फे कारवाई सुरू
जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असल्याने अनेकजण बेफिकिरीने फिरत होते. मात्र, आता ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे निर्बंध लावण्यात आले असून विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गांधी चौक, जटपुरा गेट, गोल बाजार तसेच शहरातील मुख्य चौकात अशी कारवाई सुरू आहे.
ओमायक्रॉनमुळे नवे निर्बंध लावण्यात आले आहे. विनामास्क फिरणाऱ्यांवर तसेच ज्या वाहनातून विनामास्क फिरताना आढळून येतील त्या वाहनचालकांवर तसेच आस्थापनावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे शहरात विनामास्क फिरू नये, कोरोनाच्या नियमांचे पालन करावे.
-अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, चंद्रपूर