कोणी मेले तरी, आता नसतात डोळे ओले!
By admin | Published: January 5, 2015 11:00 PM2015-01-05T23:00:50+5:302015-01-05T23:00:50+5:30
राष्ट्रसंत साहित्य विचार परिषद केंद्रीय समिती आणि श्रीगुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगर शाखेच्या वतीने आयोजित १३ वे राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनातील कविसंमेलन
राष्ट्रसंत साहित्य संमेलन : रंगलेल्या कविसंमेलनात श्रोते दंग
रत्नाकर चटप - (कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्य साहित्य नगरीतून)
राष्ट्रसंत साहित्य विचार परिषद केंद्रीय समिती आणि श्रीगुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगर शाखेच्या वतीने आयोजित १३ वे राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनातील कविसंमेलन विदर्भ राज्यातून आलेल्या कवींच्या कवितांनी चांगलेच बहरले.
पुणे येथील प्रसिद्ध कवी वादळकार, प्रा. राजेंद्र सानवणे यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. सुरेश उपगन्लावार, प्राचार्य अनिल मुसळे, ग्रामगिताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कविसंमेलनात कवींंनी गावगाड्यातील वास्तव विषय व भीषण वर्तमान काव्यातून मांडले.
विसापूरचे सुनिल बुटले यांनी जागतिकीकरणात गावाचं गावपण हरवत चालल्याची खंत ‘असे कसे माझे गाव’ कवितेतून मांडली. क्षणभर रसिकालाही विचारप्रवृत्त करायला लावणाऱ्या या कवितेत ते म्हणाले..
असे कसे माझे गाव पुरे बदलून गेले,
कोणी मेले तरी आता
नसतात डोळे ओले.
रायगड येथील कवी श्रीकांत धोटे, महाराष्ट्रातील संत महात्म्यांची विशेषत: राष्ट्रसंताची मानवतावादी ओळख आपल्या कवितेतून मांडतांना म्हणाले,
मानवतेचा ज्यांनी गुंफीला धागा
असे थोर झाले तुकडोजी बाबा.
भंडाऱ्यांचे डोमा महाराज कापगते यांनी स्वच्छ भारत कवितेतून ग्रामस्वच्छता अभियानाचा संदेश दिला. तर रवी धारणे, कळमेश्वरचे कळसाईत गुरुजी, पद्मापूरचे खुशाल साव यांनी गावगाड्यातील वास्तव रेखाटणाऱ्या कविता सादर केल्या. नापिकीने शेती तोट्यात जात असल्याने व वेळेवर पाऊस येत नसल्याने शेतकऱ्यांचा पोरगा शेतकरी व्हायला तयार होत नाही. म्हणून राजुऱ्याचे कवी किशोर कवठे यांनी शेतकऱ्यांची व्याथ मांडतांना म्हणाले..
अशी कशी रिती झाली,
ढगातली शाई,
वावराला रंगविण्या
सरी आल्या नाही.
कवी दिवाकर देशमुख यांनी राजकीय डावपेचात शेतकऱ्याविषयी सत्ता हाये स्वर्ग, शेती हाये नरक’ या भावना मांडल्या.
गोंदियाच्या प्रा. ज्योती कावळे यांनी सावित्रीच्या लेकी, कवितेतून स्त्री जीवनाची ससेहोलपत मांडली. धमेंद्र कन्नाके यांनी सपन कवितेतून गरिबांची अवस्था रेखाटली. ‘व्यथा भटक्या विमुक्ताच्या’ कवितेत सतिश लोंढे यांनी भटक्याचे जीवन वर्णन केले.
मार्डा येथील संगीता धोटे यांनी ‘हुंडा’ कवितेतून जनप्रबोधन केले. तर चंदू झुरमुरे यांनी प्रेमाचे नाते जपण्याचे आवाहन केले. मधूकर चापले यांनी ‘समर्पन’ कवितेत नरेंद्र दाभोळकरांच्या हत्योविषयी कोणीच का बोलत नाही? हा सवाल उपस्थित केला. भंडाऱ्याचे दिवाकर मोरस्कर यांनी झाडीबोलीतील कविता सादर करुन उपस्थितांची दाद मिळवली. तर संजय वैद्य यांनी ‘ध्येय’ कवितेतून प्रत्येकांनी आशावादी जगण्याची संकल्पना मांडली.
नव्या पिढीकडून अपेक्षा बाळगताना आपल्या मुलाकडूनच वडिलांना अपेक्षा ठेवता येत नाही. या आशयाची वऱ्हाडी कवी किशोर मुगल आपल्या कवितेत म्हणाले..
तिन- तिन लेकरं असून
येक नाही कामाचं,
म्हातारपण जगत आहे
नाव घेत रामाचं.
कविसंमेलनात ज्ञानानंद झोडे, रोशनकुमार पिलेवान, उमाकांत नारनवरे, निलेश टेकाम, प्रा. धनश्री मुसने यांनीही आपल्या रचना सादर केल्या. कविसंमेलनाचे बहारदार संचालन कवी रत्नाकर चटप व अविनाश पोईनकर यांनी केले.