नियम तोडून दारू विक्री कराल तर खबरदार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 05:09 PM2024-05-27T17:09:56+5:302024-05-27T17:10:47+5:30
जिल्हा प्रशासन 'अॅक्शन मोड'वर : सक्त कारवाई होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पुणे येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात दारू विक्री व परवानाबाबत जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. परवानाधारक व्यावसायिकांनी दारू विक्री करताना सर्व अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करावे. अन्यथा सक्त कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिला आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारू विक्री केली जाते. मात्र, अनेकवेळा नियम तोडले जाते. त्यामुळे यापुढे दारू विक्रेत्यांनी नियम, अटीचा भंग केल्यास कारवाई होणार आहे. विशेष म्हणजे, जिल्हा प्रशासन याकडे लक्ष ठेवणार आहे.
असे दिले निर्देश
■ एफएल-३ अनुज्ञप्तीधारकांनी कुठल्याही संबंधित किरकोळ मद्य विक्री अबकारी अनुज्ञप्तीतून २१ वर्षांखालील व्यक्त्तीस मद्य विक्री करू नये.
■ २१ ते २५ वर्षे वयोगटात असलेल्या व्यक्तीस सौम्य बिअर, सौम्य मद्य विक्री कराची.
■ २५ वर्षापेक्षा कमी वयोगटात असलेल्या व्यक्तीस तीव्र मद्य देऊ नये.
■ अनुज्ञप्तीच्या वेळेचे काटेकोरपणे पालन करावे. अनुज्ञप्ती सकाळी ११:३० ते रात्री ११:३० या वेळेतच सुरू ठेवावे.
दारू पिण्यासाठी परवाना आवश्यक
मद्य सेवन करणाऱ्या व्यक्ती जवळ मद्य सेवनाचा परवाना असणे आवश्यक आहे. अनुज्ञप्तीच्या जागेत कोणत्याही असामाजिक तत्त्व, गुंड प्रवृत्तीच्या व्यक्त्ती आढळल्यास पोलिसांना कळवावे.
सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक
अनुज्ञप्तीच्या परिसरात येणाऱ्या व जाणाऱ्या ग्राहकांच्या हालचालीवर नजर ठेवण्याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे लावावे. मंजूर जागेच्या क्षमतेपेक्षा जास्त व्यक्तींना अनुज्ञप्तीच्या ठिकाणी प्रवेश देऊ नये. परवाना कक्ष अनुज्ञप्ती कामकाजाच्या वेळेबाबतचा फलक आस्थापनेच्या आत दर्शनी भागात लावावा. या बाबींचे अतिशय काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा सक्त कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिले आहे.