विना परवानगी रस्ता खोदाल तर होऊ शकते गुन्हा दाखल !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 12:29 PM2024-07-22T12:29:51+5:302024-07-22T12:31:31+5:30
मनपाकडून परवानगी घेणे बंधनकारक : अशी आहे नियमावली
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सुरळीत वाहतूक व्यवस्था असावी म्हणून शासन लाखो रुपये खर्च करून रस्ते बनविते. मात्र, काही मंडळी विविध कारणांसाठी रस्ते खोदून ते पुन्हा जैसे थे करतात. हे प्रकार अगदी राष्ट्रीय महामार्ग ते गल्लीतील रस्त्यांच्या बाबतीत दिसून येतात. कोणताही शासकीय रस्ता खोदायचा असेल तर त्यासाठी संबंधित विभागाची पूर्वपरवानगी घ्यावी लागते. पण, बहुतांश मंडळी अशी कोणतीच परवानगी घेत नसल्याचेही समोर आले आहे.
शहरी भागात नगर परिषदेच्या हद्दीत नागरिक नळ कनेक्शन घ्यायचे असेल तर रस्ता सिमेंटचा असो वा डांबरी, ते फोडतात व नळ जोडून घेतात. पुन्हा त्या फोडलेल्या रस्त्याची ना दुरुस्ती होते, ना त्याकडे ती मंडळी लक्ष देऊन दुरुस्ती करून घेतात. परिणामी, तो नादुरुस्त रस्ता तसाच राहतो व त्यावरून प्रवास करणाऱ्या व्यक्तींचे हाल होतात. चंद्रपूर मनपा हद्दीत, तर अमृत योजनेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी मोठ्या प्रमाणात रस्ते खोदल्याचे दिसून येतात. मात्र संबंधित कंत्राटदाराने त्याची दुरुस्ती केली नसल्याने रस्ते खाचखडग्याचे झाल्याचे दिसून येत आहे.
रस्ता खोदण्यासाठी परवानगी आवश्यक
रस्ता खोदण्यासाठी त्या त्या नागरी वा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बांधकाम विभागाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. त्यासाठी संबंधितांनी कुठल्या कामाच्या प्रयोजनार्थ रस्ता खोदायचा आहे, ते कारण नमूद करणे बंधनकारक असते.
तक्रारी जातात ठाण्यात
एखाद्या रस्त्याचे खोदकाम झाल्यास त्या ठिकाणी कार्यकारी अभियंता, उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्यांनी जागेवर जाऊन पाहणी करणे अपेक्षित आहे. खोदकाम झाल्यावर तत्काळ रस्ता पूर्ववत कसा होईल, याची जबाबदारीदेखील बांधकाम विभागावर निश्चित करण्यात आली आहे.
कोठे परवानगी घ्याल?
मनपाच्या तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणारा रस्ता खोदकाम करताना संबंधित विभागाच्या परवानगीची गरज असते. मात्र, परवानगी न घेतल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो.
विना परवानगी रस्ता खोदाल तर...
मनपा क्षेत्राच्या हद्दीतील रस्त्याबाबत परवानगी ही मनपा बांधकाम विभागातून घ्यावी लागत असते, तर नगरपालिका क्षेत्र व ग्रामपंचायत क्षेत्रातील असेल तर त्या त्या हद्दीतून परवानगी घ्यावी लागते. पीडब्लूडीचा रस्ता असेल तर तिथून परवानगी घ्यावी लागते.
तक्रार आल्यास कारवाई निश्चित
विनापरवानगी रस्ता खोदल्यास दंडात्मक कारवाईसह पोलिस ठाण्यात संबंधितांविरूद्ध तक्रार दाखल करण्याची तजवीज आहे. त्यासंबंधी तक्रार आल्यास निश्चितपणे कारवाई केली जाते. गणोशोत्सव काळातदेखील मंडपासाठी रस्ता न खोदण्याच्या सूचना आहेत. रस्ता खोदायचा असल्यास परवानगी आवश्यक आहे.