युद्ध नको असेल तर बुद्ध पाहिजे

By admin | Published: October 15, 2016 12:52 AM2016-10-15T00:52:24+5:302016-10-15T00:56:30+5:30

पाकिस्तान आणि चीनची मैत्री आणि संपूर्ण जग दहशतवादाच्या उंबरठ्यावर उभे आहे.

If you do not want war then you need Buddha | युद्ध नको असेल तर बुद्ध पाहिजे

युद्ध नको असेल तर बुद्ध पाहिजे

Next

श्रीपाल सबनीस : ६० वा धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळा
ब्रह्मपुरी : पाकिस्तान आणि चीनची मैत्री आणि संपूर्ण जग दहशतवादाच्या उंबरठ्यावर उभे आहे. जगाला युद्धापासून वाचवणारा एकमेव बुद्ध आहे. बौद्ध धम्म हा वास्तववादी आहे. नुसत्या काल्पनिक गोष्टीवर बुद्धाचा विश्वास नव्हता. भारतालाच नव्हे तर सर्व जगाला सदाचार शिकविणारा पहिला महापुरुष भगवान बुद्ध होय. बौद्ध धर्म हाच जागतिक ऐक्याचा एकमेव अद्वितीय असा धर्म आहे. म्हणून युद्ध नको असेल तर बुद्ध पाहिेजे, असे मार्मिक विचार अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी ६० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याच्या निमित्ताने पंचशील एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात मुख्य अतिथी म्हणून व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंभोरा येथील बौद्ध तत्वज्ञानाचे अभ्यासक प्रा. डॉ. भदंत नंदवर्धन बोधी होते. प्रमुख वक्त्या म्हणून मराठा सेवा संघाच्या प्रवक्ता अ‍ॅड. वैशाली डोळस, ललिता सबनिस, सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष अशोक रामटेके, दादाजी शेंडे, आसाराम बोदेले, शंकर मेश्राम व विजय रामटेके आदी उपस्थित होते. डॉ. सबनिस म्हणाले की, जगाचे कल्याण फक्त बुद्ध धम्मच करू शकेल. त्या धम्माचा आदी,मध्य व अंत सर्व गोड, हितकारक व कल्याणकारी असा आहे. सध्या सर्जिकल्स स्ट्राईक्सचे यश सरकार घेत आहे. पण हे यश लष्कराचे आहे. त्यामुळे राजकारणाला अहिंसाचा संबंध जोपासणे आवश्यक आहे. हुतात्म्यांना जातधर्म चिटकवू नका. तिसरे महायुद्ध थांबवायचे असेल तर बुद्ध पाहिजे, असे विचार मांडले.
प्रमुख वक्त्या अ‍ॅड. डोळस यांनी ‘स्त्री आणि धम्म’ यावर विचार मांडताना म्हणाल्या की आजही स्त्रीचा माणूस म्हणून विचार होत नाही तर ती फक्त वस्तू म्हणून पाहिली जात आहे. धम्माने स्त्रीचा आदर त्या काळात केला. पण अजूनही समानता आली नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.भदंत नंदवर्धन बोधी यांनी ‘ब्राम्हणवाद व धम्म’, यातील फरक स्पष्ट करून ही लढाई धम्माच्या तत्वज्ञानानेच संपुष्टात येऊ शकते, असा उपदेश श्रोत्यांना अध्यक्षीय भाषणातून दिला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात समता सैनिक दलाच्या मानवंदनेने करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ब्रह्मपुरी तालुक्यातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, आदर्श शिक्षक गुणवंत वैद्य व भीमराव ठवरे यांचा सपत्निक सत्कार तसेच पंचशील वस्तीगृहातील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अशोक रामटेके, संचालन प्रा.डॉ.युवराज मेश्राम तर आभार दीपक सेमष्कर यांनी मानले. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे, प्राचार्य जयराम खोब्रागडे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, इंजिनिअर विजय मेश्राम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पी.बी. रामटेके, डॉ.मिलिंद रंगारी, सुधीर अलोणे, जगदीश मेश्राम, सरिता खोब्रागडे, बौद्धरक्षक जांभूळकर, डेव्हीड शेंडे, प्रा.उज्वला रामटेके, डॉ. ई. एल. रामटेके, नरेंद्र बांते व अन्य समितीच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: If you do not want war then you need Buddha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.