ताप न आल्यास विश्वास बसेना, लस खरी की खोटी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:33 AM2021-09-08T04:33:47+5:302021-09-08T04:33:47+5:30
चंद्रपूर : कोरोना लस घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली. मात्र, लस घेतल्यानंतर ताप आला नाही तर लस खरी की ...
चंद्रपूर : कोरोना लस घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली. मात्र, लस घेतल्यानंतर ताप आला नाही तर लस खरी की खोटी, हा संभ्रम नागरिकांत कायम आहे. त्यामुळे आरोग्य विभागानेही जागृतीवर भर देणे सुरू केले. याचा सकारात्मक परिणाम होत असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मतानुसार, कोरोना प्रतिबंधाची लस घेतल्यानंतर रोगप्रतिकारकशक्ती या स्पाइक प्रोटीनवर हल्ला करते. ज्यामुळे काही जणांना जळजळ व आजारासोबतच वेदना सुरू होतात. शरीरात अतिसामान्य दुष्परिणाम दिसतात. मात्र, एक-दोन दिवसांत आपोआप दूर होतात. लसीतून मिळणारे स्पाइक प्रोटीन वेगवान व प्रभावी असते. त्यासाठी घाबरण्याचे कारण नाही. लसीमुळे शरीरात होणाऱ्या दुष्परिणामांचा अर्थ असा आहे, की आपली रोगप्रतिकारकशक्ती सामान्य आहे. आपल्या पेशी व्हायरसपासून संरक्षणासाठी ॲटिबॉडीज तयार करीत आहेत. ज्यांना लस घेतल्यानंतर दोन्ही गुडघ्यांमध्ये वेदना होत असतील ते स्पाइक प्रोटीनमुळे होतात. काहींना तापही येतो. यावरून लस खरी की खोटी हे समजने अथवा गैरसमज करून घेणे चुकीचे असल्याचा दावा आरोग्य प्रशासनाने केला आहे. लसीकरणानंतर होणाऱ्या वेदना व कोरोना झालेला असताना होणाऱ्या वेदना याबाबतचा फरक आरोग्य विभाग समजावून सांगत आहे. वेदना सारखीच असते. मात्र, नैसर्गिक कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतरच्या लोकांना ज्या वेदना होतात. या वेदना काही दिवसांतच बऱ्या होतात. म्हणून या वेदनांबद्दल काळजी करण्याची गरज नाही. दोन्ही वेदना काही दिवसांतच दूर होतील. यावरून लसीची गुणवत्ता खरी की खोटी, हे तपासण्याचे कारण नाही. नागरिकांनी आरोग्य पथकाच्या जनजागृतीवर विश्वास ठेवावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
बॉक्स
दोनही लसींची गुणवत्ता सारखीच
चंद्रपूर जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू झाल्यानंतर सर्वात आधी कोविशिल्ड लसीचा पुरवठा झाला होता. नागरिकांमध्ये या लसीबाबत गैरसमज नव्हते. कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा विलंबाने झाला. काहींना या लसीविषयी अफवा पसरविल्या होत्या. आरोग्य विभागाच्या लक्षात येताच यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली. त्याचा चांगला परिणाम झाला. दोन्ही लसींची गुणवत्ता सारखीच असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
बॉक्स
कोविडविरोधी लस घ्यायलाच हवी
मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयाचे आजार असे कोमॉर्बिड म्हणजे इतर दीर्घकालीन आजार असतील तर लस घ्यायलाच हवी. या लोकांना संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. केंद्र सरकारने सुरुवातीला प्राधान्याने या लोकांना लस द्यायला सुरुवात केली. लस घेण्यासाठी आपल्या या आजारांसाठी सुरू असलेल्या औषधांच्या वेळापत्रकातही बदल करू नये. त्यांनी ठरलेल्या वेळेत औषधी घ्यावी, अशा सूचना तज्ज्ञांनी दिल्या आहेत.
कोट
लस घेतल्यानंतर काहीच झाले नाही...
माझ्या संपर्कातील काही जणांना ताप, शरीर दुखणे, अशक्तपणा अशा समस्या निर्माण झाल्या. मलाही थोडी कणकण झाले. मात्र, दुसऱ्या दिवशी ही समस्या आपोआप दूर झाली. डॉक्टरला दाखविले असता लसीकरणानंतर जाणवणारे हे सौम्य परिणाम असल्याचे सांगितले.
-विवेक बुरडकर, समाधी वाॅर्ड, चंद्रपूर
लस घेण्यापूर्वी मला काही ओळखीच्या लाेकांनी दुष्परिणामाबाबत माहिती दिली. लस घेतल्यानंतर असे काहीच जाणवले नाही. थोडी तापाची लक्षणे जाणवली. मात्र, अजूनही कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीबाबत समाजमनात अफवा आहेत.
-राजेंंद्र तिवस्कर, अंचलेश्वर वॉर्ड, चंद्रपूर
उपाशीपोटी लस घेऊ नका
लस घ्यायला जाताना रिकामी पोटी जाऊ नका. लस घेतल्यानंतर अशक्तपणा किंवा क्वचित चक्कर आल्यासारखेही वाटेल. त्यामुळे थोडे तरी खाऊन जावे. लस घेतल्यानंतर तो भाग किंचित दुखू शकतो. सूज येऊ शकते. पण काही दिवसांतच आपोआप कमी होतो, अशी माहिती जि. प. आरोग्य विभागाने दिली.