पक्ष्यांना फरसाण अन् पाव खाऊ घालाल, तर जाल तुरुंगात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 17:54 IST2025-03-15T17:53:43+5:302025-03-15T17:54:30+5:30
भूतदया पक्ष्यांसाठी ठरू शकते घातक : पक्ष्यांना अयोग्य खाद्य देणाऱ्याला होणार दंड

If you feed birds with farsan and bread, you will go to jail.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पक्षी दिसले की अनेकांकडून पक्ष्यांना खाद्यपदार्थ खायला दिले जातात. प्रेक्षणीय स्थळे, उद्याने तसेच पाणवठ्यांवर उतरलेल्या देशी-विदेशी पक्ष्यांना अप्रमाणित खाद्य जसे पाव, चपाती, फरसाण, भात, शेत असे पदार्थ देणे नियमबाह्य आहे. पक्ष्यांना त्यांच्या शरीररचनेच्या विपरीत खाद्य घालून त्यांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना दंड अथवा शिक्षा होऊ शकतो.
काही दिवसांपूर्वी मुंबईच्या किनाऱ्यावरील सीगल या पक्ष्याला चिप्ससह इतर दिल्यावरून पक्षी अभ्यासकांनी नाराजी व्यक्त केली होती या पक्ष्यांना भरवला जाणारा 'जंक फूड'चा खाऊ त्यांच्या प्रकृतीसाठी घातक ठरू शकतो, अशी भीती व्यक्त करत पक्ष्यांना अशा प्रकारचा खाऊ घालण्यास बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली होती.
केवळ याच पक्ष्यांसाठी नाही तर इतर पक्ष्यांसाठी हे खाद्य घातक ठरू शकते. चंद्रपूर शहर तसेच जवळपासच्या तलाव, विहिरीजवळही येणाऱ्या पक्ष्यांना शेव, चिवडा, चिप्स खाऊ घालण्याचे प्रकार घडतात. त्यावर वेळीच प्रतिबंध करणे गरजेचे आहे. विशेषतः जुनोना तलाव परिसरात हा प्रकार अधिक दिसून येतो.
पाव, शेव पक्ष्यांसाठी ठरतात हानिकारक
अनेकजण चण्याच्या पिठापासून बनवलेल्या गाठिया, फरसाण, चिवडा, शेव आदी पदार्थ पक्ष्यांना देतात, हे पदार्थ पक्ष्यांच्या प्रकृतीसाठी घातक असल्याचा दावा पक्षीप्रेमींनी केला आहे.
जिल्ह्यातील पक्षी निरीक्षणाची ठिकाणी
- जुनोना तलाव : चंद्रपूर येथून जवळच असलेल्या जुनोना तलाव परिसरात पक्षी निरीक्षणासाठी अनेक पक्षीप्रेमी जातात.
- इरई डॅम : चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा करणारा इरई डॅम परिसरात अनेक देशी-विदेशी पक्षी स्थलांतरित होऊन येतात. येथेही पक्षी निरीक्षण केल्या जाते. यासह जिल्ह्यातील इतर पाणवठ्यांजवळही पक्षी निरीक्षण केल्या जाते.
- घोडाझरी, चारगाव धरण: चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले चारगाव धरण, घोडाझरी तलाव परिसरातली अनेक पक्षीमीत्र पक्षीनिरीक्षणासाठी जातात. विशेषतः हिवाळ्याच्या दिवसामध्ये येथे गर्दी असते.
जलाशयांवर विदेशी पक्ष्यांचा अधिवास
हिवाळ्याच्या काळात अनेक स्थलांतरित पक्षी हे सैबेरिया, रशिया, तिबेट, युरोपातून हजारो किमीचा प्रवास करून जिल्ह्यातील पाणवठ्यांवर येत असतात. यावर्षी मोठ्या प्रमाणात पक्षी आढळून आले. पक्षीप्रेमींसाठी पर्वणीच ठरत असतात.
"प्रत्येक जीवांचे खाद्य ठरलेले आहे. त्यामुळे पक्ष्यांना जंक फूडसारखे खाद्य देणे चुकीचे असून, त्यांचे आरोग्य धोक्यात घालणे होय. त्यामुळे असा प्रयोग कुणीही करू नये. जंकफूड किंवा इतर पदार्थ पक्ष्यांना खायला दिल्यास, त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. पक्षी प्रामुख्याने भरपूर प्रोटीन असणारे पदार्थ खातात. अनेकजण चिप्स, तेलकट पदार्थ पक्ष्यांना खायला टाकतात, हे चुकीचे आहे."
- बंडू धोतरे. पक्षी अभ्यासक, चंद्रपूर