बाल कामगार आढळल्यास कायद्याचा आधार घ्या
By admin | Published: June 17, 2016 01:04 AM2016-06-17T01:04:00+5:302016-06-17T01:04:00+5:30
बालक ही राष्ट्राची उद्याची संपत्ती असून लहान मुलांना चांगले शिक्षण व संस्कार देणे समाजाची जबाबदारी आहे.
पी. एस. इंगळे : जिल्हा न्यायालयात बाल कामगार दिन कार्यक्रम
चंद्रपूर : बालक ही राष्ट्राची उद्याची संपत्ती असून लहान मुलांना चांगले शिक्षण व संस्कार देणे समाजाची जबाबदारी आहे. हॉटेल व इतर ठिकाणी मुले मजूरी करताना आढळल्यास बाल कामगार विरोधी कायद्याचा आधार घ्या, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पी. एस. इंगळे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने ए.डी.आर सेंटर, जिल्हा न्यायालय चंद्रपूर येथे बुधवारी आयोजित बाल कामगार दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अॅड. महेंद्र असरेट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पी. एस. इंगळे पुढे म्हणाले, मुलांना चांगले शिक्षण व मानसिकता चांगली राहावी म्हणून चांगले संस्कार देणे आवश्यक आहे. जागतिक स्तरावर बाल कामगाराचे प्रश्न गंभीर स्तरावर पोहोचले आहेत, अशा परिस्थितीत बालकांची काळजी घेण्याची पहिली जबाबदारी ही त्यांच्या आई-वडिलांची आहे. त्यामुळे आई वडिलांनी मुलांवर चांगले संस्कार करणे, त्यांना चांगले शिक्षण, चांगले विचार द्यावे. चहाच्या दुकानात, किराना दुकाणात लहान मुल काम करताना दिसतात. परंतु आपण विरोध करत नाही, उलट त्यांनाच आपण आदेश देतो.
व्यावसायिकांना तसेच मालकांना त्यांच्या कामावर कमी पैशात लहान मुले कामगार म्हणून उपलब्ध व्हावेत असे वाटते. त्यामुळे ते लहान मुलांना कामावर ठेवतात. अशा प्रसंगी संबंधीत मालकावर, उद्योजकांवर कायदेशिर कारवाई करण्याची तरतूद कायद्यात आहे.
आई-वडीलांनी लहान मुलांना कामावर न लावता त्यांना शिक्षण देवून उद्योजक, अधिकारी, डॉक्टर व वकील केले पाहिजे. सामाजिक भुमिका जर प्रत्येकाने सांभाळली तर शासनाचे धोरण यशस्वी होतील, असे ते म्हणाले.
चंद्रपूरचे अधिवक्ता महेंद्र असरेट यांनी लहान मुलांना हॉटेल, दुकानात कामावर लावल्या जाते. लहान मुलांची तस्करी करुन त्यांना कमी पैशात कोणत्याही कामावर लावल्या जाते. जसे कामगार हे आपल्या हक्कासाठी संघर्ष करतात, तसे बाल कामगार हे संघर्ष करु शकत नाही. ज्या मालकांकडे लहान मुलं काम करीत असतील तर त्यांनी त्यांना सर्व सोयी-सुविधा दिल्या पाहिजेत. युनिसेफ संघटना यांनी आपल्या अहवालात सांगितले की, जवळपास १ कोटी मुले बाल कामगार म्हणून काम करीत आहेत. आपल्या देशात बाल मजूर कायदा आहे, तरीही व्यावसायिक बालकांना कामावर लावतात. त्यातून त्यांचे काम कमी पैशात होते. शॉप इन्सपेक्टर हे दुकानाची पाहणी करतात तेव्हा त्यांना बाल मजूर आढळल्यास ते शासनाला अहवाल पाठवतात, असे सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)