‘त्यांना’ तिकीट दिल्यास पुगलिया विरोधात उमेदवार उभे करणार
By admin | Published: March 29, 2017 01:46 AM2017-03-29T01:46:16+5:302017-03-29T01:46:16+5:30
काँगे्रसपासून दूर जाऊन महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाला मदत करणाऱ्या ‘त्या’ १२ नगरसेवकांना तिकीटा देण्याची गरज नाही.
पक्ष निरीक्षकांसमोर दिला इशारा : मोघे म्हणाले, काँग्रेस बहुमतासाठी लढणार
चंद्रपूर : काँगे्रसपासून दूर जाऊन महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाला मदत करणाऱ्या ‘त्या’ १२ नगरसेवकांना तिकीटा देण्याची गरज नाही. ज्यांच्यामुळे पक्षाला महापौरपद गमवावे लागले त्यांनाच तिकीटा द्याव्यात, असा आग्रह पक्षातील कुणी करीत असेल आणि ते मान्य होत असेल, तर आपण या प्रक्रियेतून बाहेर पडू आणि विरोधात उमेदवार उभे करू, असा गर्भीत ईशारा माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मंगळवारी दिला.
काँगे्रसचे निवडणूक निरीक्षक शिवाजीराव मोघे आणि आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती राजीव गांधी कामगार भवनात पार पडल्या. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माजी खासदार नरेश पुगलिया यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर आपली भूमिका अगदी स्पष्टपणे मांडली. ते म्हणाले, त्या १२ नगरसेवकांच्या ऐवजी आमदार वडेट्टीवार अन्य कुणालाही तिकीटा देणार असतील अथवा अन्य कुणासाठी तिकीटांचा आग्रह धरत असतील, तर आपण त्यांच्या सोबत राहून मदत करू. मात्र ज्यांनी पक्षाविरूद्ध काम केले, त्यांना मदत करण्याचा जराही विचार करणार नाही. पत्रकार परिषदेत बोलताना शिवाजीराव मोघे म्हणाले, काँग्रेस एकजुटीने बहुमतासाठी लढेल. ५८० जणांनी मुलाखती दिल्या. उमेदवारांच्या यादीवर निवड समिती विचार करेल. त्यानंतर राज्य निवड समितीसमोर यादी ठेवली जाईल. उमेदवांची यादी ३१ मार्च अथवा १ एप्रिलला जाहीर होईल. आघाडीसाठी रिपाइंसोबत चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)
दुसरीकडे वडेट्टीवार समर्थकांचा ‘परिचय मेळावा’
राजीव गांधी कामगार भवनात इच्छुकांच्या मुलाखती सुरू असताना दुसरीकडे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत नागपूर मार्गावरील एका हॉटेलच्या सभागृहात त्यांच्या समर्थकांचा परिचय मेळावा पार पडला. विशेष म्हणाजे, या कार्यक्रमाला पक्षाच्या निवडणूक निरीक्षकांच्या गटाचे प्रमुख शिवाजीराव मोघे, आमदार गोपालदास अग्रवाल, जिया पटेल आदी उपस्थित होते. आमदार वडेट्टीवारांनी आपल्या समर्थकांचा निरीक्षकांना मेळाव्यात परिचय करवून दिला. विशेष म्हणजे, चर्चेत असलेल्या १२ नगरसेवकांच्या गटातील नगरसेवक या मेळाव्याला प्रामुख्याने उपस्थित होते. सुरूवातीला हा कार्यक्रम म्हणजे पुगलिया विरोधी गटातील तिकीटेच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम असल्याची चर्चा होती. मात्र, हा मुलाखतीचा कार्यक्रम नसून कार्यकत्यांचा आणि तिकीटेच्छुकांचा परिचय मेळावा असल्याचे आमदार वडेट्टीवार यांनी मंचावरून स्पष्ट केले. दरम्यान पत्रकारांशी बोलताना आमदार वडेट्टीवार म्हणाले, मनपाच्या निवडणुका पक्षाचे वरीष्ठ नेते नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वातच लढल्या जातील. पक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी आपण एका मंचावर येवून प्रचार करू, असेही ते म्हणाले. मात्र त्या १२ नगरसेवकांना तिकीटा द्याव्या यासाठी आपण आग्रही आहोत. त्या बाबत अंतीम निर्णय प्रदेशाध्यक्षच घेणार असल्याने निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांना तिकीटा दिल्या जातील, असेही ते म्हणाले.