पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस घेतल्यास साईड इफेक्ट तर होणार नाही ना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:33 AM2021-01-08T05:33:35+5:302021-01-08T05:33:35+5:30
चंद्रपूर : कोराेना व्हायरसचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने सर्वप्रथम डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस ...
चंद्रपूर : कोराेना व्हायरसचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने सर्वप्रथम डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा आदेश जारी केला. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील कोरोनाची लस घेण्यासाठी जिल्ह्यातील १६ हजार १०९ डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली. राज्यात सर्वात आधी १०० टक्के नोंदणी करणारा चंद्रपूर जिल्हा प्रथम ठरला. यासाठी प्रशिक्षणही दिले जात आहेत. मात्र, पहिल्या टप्प्यातच कोरोनाची लस घेतल्यास काही साईड इफेक्ट तर होणार नाही, अशी शंका काही कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी जगभरातील अनेक देश लस निर्मितीसाठी संशोधन करीत आहेत. भारताने आजमितीस कोव्हॅक्सीन आणि कोविडशिल्ड या दोन लसींना मान्यता दिली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आदेशानुसार राज्याच्या आरोग्य विभागाने पहिल्या टप्प्यातील कोरोनाची लस देण्यासाठी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करून यादी सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे जिल्हा आरोग्य प्रशासनाने राज्यात सर्वात प्रथम १०० टक्के नोंदणी पूर्ण केली. नोंदणी केलेल्या एकूण १६ हजार १०९ शासकीय डॉक्टर व कर्मचाऱ्यांमध्ये ३ हजार ८३५ खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ८४५ शासकीय व २,२३८ खासगी कर्मचाऱ्यांनीही लस घेण्यासाठी नोंदणी केली आहे.
डॉक्टर, कर्मचाऱ्यांची काय भावना
कोरोना प्रतिबंधाक लस घेतल्यानंतर काय परिणाम होणार, याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे पहिल्या ऐवजी दुसऱ्या टप्प्यातील लस घेणे जास्त सोईचे होईल, अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका आरोग्य कर्मचाऱ्याने दिली. एका डॉक्टरने जागतिक महामारी रोखण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचारी आघाडीवर राहणार नाही तर कोण राहणार, असा उलट प्रश्न विचारून आरोग्य कर्मचाऱ्याचे म्हणणे खोडून काढले. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाबाबत टोकाचा विरोध नाही, हे स्पष्ट होऊ लागले आहे.
कोट
राज्य शासनाच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्यातील कोरोनाची लस घेण्यासाठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शितगृह, व्हॅक्सीन वाहन, डॉक्टर- कर्मचारी यांचे प्रशिक्षण याबाबत गांभीर्याने लक्ष दिले जात आहे. लस घेतल्यानंतर संबंधितांच्या आरोग्यावर कोणतेही अनिष्ट परिणाम होणार नाही. यासंदर्भात केंद्र व राज्य आरोग्य विभागाचे मार्गदर्शक सूचना जाहीर होणार आहेत. त्यामुळे डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीबाबत घाबरण्याचे कारण नाही.
-डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा आरोग्य अधिकारी. जि. प. चंद्रपूर