चंद्रपूर जिल्ह्यातल्या माणिकगड किल्ल्यावरील भुयारी मार्गाकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 10:51 AM2017-12-09T10:51:11+5:302017-12-09T10:51:38+5:30
जिवती येथील प्रसिद्ध माणिकगड किल्ल्यावर प्राचीन भुयारी मार्ग शोधण्यात जिवतीच्या वनविभागाला यश मिळाले. मात्र पुरातत्व विभागाने या प्राचीन भुयारी मार्गाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने आजही हा भुयारी मार्ग बंद अवस्थेत आहे.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : जिवती येथील प्रसिद्ध माणिकगड किल्ल्यावर प्राचीन भुयारी मार्ग शोधण्यात जिवतीच्या वनविभागाला यश मिळाले. या प्राचीन रस्त्याकडे पुरातत्व विभागाने विशेष लक्ष देण्याची मागणीही वनविभागाच्या माध्यमातून केली गेली. मात्र पुरातत्व विभागाने या प्राचीन भुयारी मार्गाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने आजही हा भुयारी मार्ग बंद अवस्थेत आहे.
जीवती तालुक्यातील निसर्गरम्य माणिकगड किल्ल्यावर ऐतिहासिक जीवनाची साक्ष देणाऱ्या अनेक वास्तु उभ्या आहेत. त्या ठिकाणी हेमाडपंथी विष्णूचे मंदिर असून मोठ्या प्रमाणात भाविक व पर्यटक येथे येत असतात. परंतु, या किल्ल्यावरील काही प्राचीन वास्तु संबंधीत विभागाकडून दुर्लक्ष केल्या जात असल्याने पर्यटकांची हिरमोड होत असल्याचे बोलले जात आहे. किल्ल्यावर चढताना लागणाऱ्या हरिण गेटच्या मागच्या बाजूला प्राचिन भुयारी रस्ता आहे. त्या भुयारी रस्त्याच्या गेटवर गणपतीची मूर्ती कोरलेले चित्र आजही स्पष्टपणे दिसते. गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या प्राचीन भुयारी मार्गाचा शोध घेण्यात जीवती वनविभागाला यश आले. परंतु पुरातत्व विभागाला कळवूनही या भुयारी मार्गाला मोकळा करण्याच्या कुठल्याही हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे आजही हा भुयारी मार्ग बंदच असून याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
पुरातत्व विभागाने काम बंद केले
किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तुच्या देखभाल दुरुस्तीचे काम पुरातत्व विभागाकडून गेल्या तीन वर्षांपासून सुरु होते. यात किल्ल्यावरील संरक्षण भिंत, घोडपांग सारखी इत्यादी कामे झाली आहेत. परंतु, संरक्षण भिंतीवरुन पर्यटकांच्या रहदारी व परिसराचा आनंद घेण्यासाठी सुरू असलेले पायव्याचे काम पुरातत्व विभागाने बंद करण्यात आले आहे. याबाबत कंत्राटदार काकडे यांना विचारणा केली असता, पुरातत्व विभागानेच काम बंद केल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.