अवैध प्रवासी वाहतुकीकडे दुर्लक्ष
By admin | Published: October 20, 2014 11:09 PM2014-10-20T23:09:11+5:302014-10-20T23:09:11+5:30
बल्लारशहा शहरात मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुरु आहे. याकडे मात्र, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने अपघात घडण्याची शक्यता बळावली आहे.
चंद्रपूर : बल्लारशहा शहरात मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुरु आहे. याकडे मात्र, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने अपघात घडण्याची शक्यता बळावली आहे.
शहरात प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी व इतर कामांसाठी येणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढत आहे. हजारोंच्या संख्येत बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी दिसून येते. स्थानिक जयस्तंभ चौकातील बसस्थानकावरही मोठी गर्दी असते. मात्र, या बसस्थानकाला अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांनी विळखा घातला आहे.
बसस्थानकावरुन नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा आदी मार्गाच्या बसगाड्या धावत असतात. मात्र या बसस्थानकाभोवती काळी-पिवळी तसेच आॅटो चालकांनी विळखा घातल्याने जागेअभावी एसटी चालकांना आपले थांबे बदलावे लागत आहे. यामुळे नागरिक व विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. प्रवासी जेथे बसगाड्या थांबतात तेथे बसची वाट पाहत उभे राहतात. मात्र, या अवैध वाहनांच्या विळख्याने एसटी बसच्या चालकांची गोची होत आहे.
बस थांबे सोडून आपले वाहन दुसऱ्या ठिकाणी थांबवीत असल्याचे चित्र शहरात बघायला मिळत आहे. त्यामुळे थांब्यावर उभे असलेले प्रवासी धावत जाऊन गाडीत बसतात. या प्रकारामुळे दररोज छोटे-मोठे अपघातही घडतात. एसटीच्या थांब्याजवळच वाहतूक पोलीस आपले कर्तव्य बजावत असतात. हा सर्व प्रकार ते उघड्या डोळ्याने बघतात. त्यामुळे या अवैध वाहतूक करणाऱ्यांना एक प्रकारचे अभयच मिळत आहे. बसथांब्याच्या जागेवर काळी-पिवळी, आॅटोरिक्षा, सायकल रिक्षा तसेच फळांच्या गाड्या उभ्या असल्याने रस्ता अडवला जातो व तो अरुंद पडतो. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
(स्थानिक प्रतिनिधी)