मनपाचे विकासाकडे दुर्लक्ष
By Admin | Published: July 10, 2016 12:40 AM2016-07-10T00:40:46+5:302016-07-10T00:40:46+5:30
शहरातील प्रोफेसर कॉलनीसह या परिसरातील विविध समस्या सोडविण्यासाठी संयुक्त विकास समिती मागील २५ वर्षांपासून आंदोलन, ...
शंकर सागोरे : संयुक्त विकास समितीची पत्रकार परिषद
चंद्रपूर : शहरातील प्रोफेसर कॉलनीसह या परिसरातील विविध समस्या सोडविण्यासाठी संयुक्त विकास समिती मागील २५ वर्षांपासून आंदोलन, मोर्चे, पत्रव्यवहार तसेच माहितीच्या अधिकारांतर्गत पूर्वीची नगरपालिका आणि महानगरपालिकेचे लक्ष केंद्रीत करीत आहे. परंतु मनपाचे विकासाकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप पत्रपरिषदेमधून संयुक्त विकास समितीचे कार्याध्यक्ष शंकरराव सागोरे यांनी केला आहे.
प्रोफेसर कॉलनी, सुगत नगर, बुद्ध नगर, सिस्टर कॉलनी, ठक्कर कॉलोनी, मानवतानगर, न्यू शेंडे लेआऊट, हरिओम नगर, स्वावलंबी नगर, म. ज्योतिबा कॉलोनी, सावित्रीबाई फुले सोसायटी, जगन्नाथबाबा नगर आदी भागातील रस्ते, नाल्यांचे बांधकाम अजूनपर्यंत करण्यात आलेले नाही. जगन्नाथबाबा नगरकडून स्वावलंबी नगरमधून ईरई नदीला मिळणारा मोठा नाल्याच्या दोन्ही बाजूस संरक्षत भिंत बांधण्याचे कंत्राट मंजूर झाले नाही. त्यामुळे या वस्त्यांमध्ये पुराचे पाणी येत असते. इरई नदीचे खोलीकरण आणि नदीच्या दोन्ही बाजूचा परिसर सौंदर्यीकरण करून चौपाटीसारखे स्वरुप येईल, अशा प्रकारचा विकास करणे सर्व कॉलोन्यांमधील रस्ते हे क्राँक्रीटचे करणे, काही कॉलन्यांमध्ये नळयोजना कार्यान्वित अजूनही झालेली नाही. मनपाचे पोल आणि पथदिवे काही ठिकाणी नाही. त्यासंबंधात संयुक्त विकास समिती पाठपुरावा करीत आहे.
जनतेकडून टॅक्स वसूल करणे, टॅक्समध्ये भरमसाठ वाढ करणे तसेच मनपामधील झालेला भ्रष्टाचाराची त्वरित चौकशी करावी. विकासाबाबत ज्या सामाजिक संघटना कार्य करीत आहेत, अशा संघटनांना मनपाचे विकास आराखडा बैठकीस न बोलविणे या धोरणाचा निषेध करण्यात येत आहे. आझाद बागेतील आतील रस्ते तसेच प्रवेशद्वाराजवळ खड्ड पडलेले आहेत मनपाचे मुळीच लक्ष नाही. (प्रतिनिधी)