वनसंरक्षणाकडे होतोय दुर्लक्ष
By admin | Published: November 12, 2016 12:59 AM2016-11-12T00:59:11+5:302016-11-12T00:59:11+5:30
मध्य चांदा वनविभागातंर्गत कोठारी वनपरिक्षेत्रातील वन्यप्राणी व जंगल संरक्षणाकडे वनकर्मचाऱ्यांचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.
कोठारी वनपरिक्षेत्र : अधिकारी कर्मचारी सुस्त
कोठारी : मध्य चांदा वनविभागातंर्गत कोठारी वनपरिक्षेत्रातील वन्यप्राणी व जंगल संरक्षणाकडे वनकर्मचाऱ्यांचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या जिवीतास व जंगल क्षेत्रास अवैध वृक्ष तोडीने धोका निर्माण झाला आहे. मात्र याकडे वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
कोठारी वनपरिक्षेत्रातंर्गत करंजी उपवनक्षेत्रातील धानापूर शेत शिवारात नुकतेच विद्युत प्रवाहाने पट्टेदार वाघाच्या मृत्युने वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. जंगल क्षेत्रालगत शेतशिवार असल्याने उभ्या पिकाची नासाडी वन्यप्राण्यांकडून होणे नित्याची बाब बनली आहे. पिकाचे नुकसान वन्यप्राण्यांकडून होत असल्याच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांकडून वनविभागाला करण्यात आल्या होत्या. मात्र वनविभागाकडून त्यावर उपाययोजना करण्याऐवजी नेहमीच दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान होते.
पिकांना वाचविण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करतो. त्यामध्ये कधीकाळी वन्यप्राण्यांचा बळीसुद्धा जात असतो. यामध्ये कोठारी वनपरिक्षेत्रातील कोठारी, करंजी, घोसरी, पोंभूर्णा उपवनक्षेत्रात शेतकऱ्यांनी केलेल्या उपाययोजनेत अनेक वन्य प्राण्यांचा जीव गेला आहे. वन्यप्राण्यांवर प्रतिबंध करण्याच्या मागणीकडे वनाधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांना नाईलाजास्तव पीक बचावात्मक पाऊल उचलावे लागते. त्यामध्ये वन्यप्राण्याचे बळी जातात. मात्र वनविभागांनी शेतकऱ्यांच्या मागणीकडे वेळीच लक्ष केंद्रीत करून कर्मचाऱ्यांच्या गस्ती वाढवून वन्य प्राण्यांना शेतात येण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजना केल्यास शेतकऱ्यांचे पीक व वन्य प्राण्यांचे जीव वाचले असते.
मागील महिण्यात कुडेसावली शेतशिवारात धुमाकुळ घालणाऱ्या चार वन्यप्राण्याची शिकार करण्यात आली. या प्रकाराची सर्वत्र चर्चा झाली. मात्र याकडे वनाधिकाऱ्याने लक्ष न दिल्याने सदर प्रकारावर पांघरून पडले.
कोठारी वनपरिक्षेत्रातील जंगलात सध्या अवैध वृक्षतोडीला उधान आले आहे. साग वृक्षासारखे मुल्यवान वृक्षांची सऱ्हासपणे अवैध धंदेवाले कटाई करीत आहेत. नयन रम्य उभे जंगल बकाल होत आहे. याकडे वनाधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. आजपर्यंत याबाबत कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही व ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे वनपरिक्षेत्रात अवैद्य धंदे वाढत आहेत. (वार्ताहर)
पट्टेदार वाघाचे मृत्यू प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
करंजी उपवनक्षेत्रातील धानापूर येथे वाघाचा विद्युत प्रवाहाने मृत्यू झाला. त्यानंतर शेतकऱ्याने बचावात्मक पवित्रा घेत शेतातच वाघाला पुरले. या प्रकाराची चर्चा सतत दोन दिवस रंगली. ती कोठारीपर्यंत पोहचली. मात्र सदर प्रकाराबाबत वनकर्मचाऱ्यांना माहिती नव्हती, असे असले तरी वास्तविकता निराळीच आहे. वाघाच्या मृत्यूनंतर उधाण आलेली चर्चा स्थानिक वनकर्मचाऱ्यापर्यंत त्याच रात्री पोहचली,मात्र सदर प्रकार दडपण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला.मात्र माध्यमांच्या प्रतिनिधींना ही बाब समजताच व हत्या करणारा शेतकरी स्वत: वनविभागात दाखल झाल्याने प्रकरण अंगलट येवू नये, म्हणून सदर प्रकाराच उलगडा झाला नाही. अन्यथा हे प्रकरण दाबण्यात आले असते. अशी चर्चा या परिसरात मोठ्या जोरात सुरु आहे. परंतु आम्ही घटनेचा शोध लावला असता, असे वनकर्मचारी सांगत आहेत.