मुस्लीम बांधवांच्या इज्तेमाचा समारोप
By admin | Published: February 7, 2017 12:33 AM2017-02-07T00:33:37+5:302017-02-07T00:33:37+5:30
इस्लाम धर्मातील तत्त्वानुसार आचारण करण्याची शिकवण देण्यासाठी चंद्रपुरात पहिल्यांदाच तीन दिवसीय इज्तेमाचे आयोजन करण्यात आले होते.
चंद्रपुरात प्रथमच आयोजन : देश-परदेशातील मुस्लिमांचे संमेलन
चंद्रपूर : इस्लाम धर्मातील तत्त्वानुसार आचारण करण्याची शिकवण देण्यासाठी चंद्रपुरात पहिल्यांदाच तीन दिवसीय इज्तेमाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात देश-परदेशातील मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. त्याचा समारोप सोमवारी करण्यात आला.
चंद्रपूर येथील छोटी मशीद वक्फ कमेटीच्या वतीने स्थानिक बिनबा गेट परिसरात असलेल्या मोकळ्या जागेवर तंबू उभारून हे संमेलन घेण्यात आले. या संमेलनाचा प्रारंभ शनिवारी करण्यात आला होता. त्यामध्ये इस्लामचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या मूळ शिकवणीची चर्चा करण्यात आली. इस्लाममध्ये मानवतावादाची मूल्य रूजविण्यात आली आहेत. ही मूल्य सामान्य मुस्लीम नागगरिकांने आपल्या जीवनात जपावे आणि संपूर्ण मानव जातीचे जीवन सुखी करावे, अशी शिकवण या इज्तेमामध्ये देण्यात आली. या संमेलनात विदर्भ, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेशासह परदेशातीलही मुसलमान सहभागी झाले होते. या संमेलनासाठी छोटी मशीद वक्फ कमेटीला सर्वांचे सहकार्य मिळाले. संमेलनात सहभागी होणाऱ्यांसाठी निवास आणि भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती. अत्यंत शांततेमध्ये आणि शिस्तबद्ध पद्धतीने ही संपूर्ण व्यवस्था तीन दिवस पाळण्यात आली. समारोपानंतर सर्व मुस्लीम बांधव आपापल्या गावाला शांततेत परत गेले. संमेलन परिसरात पार्किंगगची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. या आयोजनामध्ये चंद्रपूर महानगरपालिकेसह पोलीस प्रशासनाने सहकार्य केले. (प्रतिनिधी)