महावितरण कंपनीच्या खांबावरून अवैध केबलचे जाळे
By admin | Published: January 5, 2015 11:01 PM2015-01-05T23:01:12+5:302015-01-05T23:01:12+5:30
बल्लारपूर शहरासह तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीच्या खांबावरून केबल नेटवर्कचे जाळे अवैधरित्या पसरविण्यात आले आहे. यासाठी वीज कंपनीकडून कोणतीही
कोठारी : बल्लारपूर शहरासह तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीच्या खांबावरून केबल नेटवर्कचे जाळे अवैधरित्या पसरविण्यात आले आहे. यासाठी वीज कंपनीकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. तसेच गावात केबलचे जाळे पसरविण्याकरिता ग्रामपंचायतकडून परवानगी घेण्यात आली नाही. परिणामी शासनाचा मोठा महसूल बुडत आहे.
बल्लारपूर तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात दहा हजारांच्या वर केबल जोडणी आहे. यासाठी प्रतीमाह प्रती जोडणीसाठी १५ रुपये शासनाच्या तिजोरीत कर भरल्या जातो. प्रत्यक्षात प्रती जोडणीसाठी एक महिन्याकरिता १५० ते २०० रुपये ग्राहकांकडून वसुल केल्या जातो. या धंद्यात केबल मालक एकट्या बल्लारपूर तालुक्यात १० हजार जोडणीसाठी एका महिन्यात पंधरा लाख रुपये गोळा करतो.
शासनाला मनोरंजन करापोटी एका महिन्यात केवळ दीड लाख रुपयांचा भरणा करतो. यात शासनाची मोठ्या प्रमाणात दिशाभूल करण्यात येते.
हा धंदा मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष का, असा नागरिकांचा सवाल आहे.
शहरात व गावात वीज वितरण कंपनीच्या खांबावरून, विद्युत तारेवरून केबल पसरविण्यात आले आहे. लोकांच्या घरावरून बेकायदेशिर केबल टाकण्यात आले आहेत. यासाठी वीज वितरण कंपनीकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. तशी त्यांना गरजही भासली नाही. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना केवळ संचालक हाताशी धरून त्यांचे खिसे महिनेवारी गरम करून कंपनीच्या संपत्तीचा खुलेआम वापर सुरू आहे. याकडे मात्र कोणतेही अधिकारी लक्ष द्यायला तयार नाही.
याबाबत बल्लारपूर येथील वीज वितरण कंपनीच्या अभियंत्याला विचारले असता, याबाबत आपणास काहीही माहित नाही. मात्र कंपनीने शासनाच्या संपत्तीचा वापर खाजगी केबल मालकांना करण्याची मुभा दिली नाही. तसे असेल तर ते त्वरीत हटविण्याची कारवाई केली जाईल, असे सांगितले. (वार्ताहर)