फार्म हाऊसची संख्या वाढली, शेतीची अवजारे ठेवण्याचा नियम धाब्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 05:50 PM2021-10-18T17:50:04+5:302021-10-18T18:08:24+5:30
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे अनेकांनी आसपास असणाऱ्या जमिनी विकत घेऊन फार्म हाऊस बांधले. निवासी वापर करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या एनए परवानगीवर फार्म हाऊस बांधता येत नाही. तसेच मंजुरी देताना या फार्म हाऊसमध्ये शेतीची अवजारे व उत्पादन तसेच साठवणूक करावी लागते.
चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पामुळे पर्यटनाचे केंद्रबिंदू झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यात फार्म हाऊस उभारणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या फार्म हाऊसमध्ये शेतीची अवजारे ठेवण्याचा नियम धाब्यावर बसवून काही सधन व्यक्ती सेंकड होमच्या नावाखाली फार्म हाऊस बांधत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्याला समृद्ध वनसंपदा लाभली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे देशभरातील पर्यटकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे, या प्रकल्पाभोवती असणाऱ्या जमिनी अनेकांनी विकत घेऊन त्यावर फार्म हाऊस उभारले आणि अजुनही फार्म हाऊस प्लॉटिंगची कामे सुरू आहेत.
यातील बऱ्याच जणांनी तीन वर्षांपूर्वी निवासी वापरासाठी एनए मंजूर करवून घेतला होता. आता त्या जागेवर फार्म हाऊस उभारण्यात येत आहेत. फार्म हाऊस बांधकाम करण्यापूर्वी स्वतंत्र्यरित्या परवानगी घ्यावी लागते. मात्र, काहींनी परवागनीविनाच कोट्यवधींची गुंतवणूक करून बांधकाम सुरू केले.
निवासी वापर करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या एनए परवानगीवर फार्म हाऊस बांधता येत नाही. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज करावा लागतो. विशेष म्हणजे मंजुरी देताना या फार्म हाऊसमध्ये शेतीची अवजारे व उत्पादन तसेच साठवणूक करावी लागते. फार्म हाऊसमधून व्यवसाय करता येत नाही. अशा प्रकारचा कुणी व्यवसाय सुरू केला असेल तर तो बेकायदा असतो, अशी माहिती भूमिअभिलेख विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली.
तपासणीअभावी मनमानी
चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी फार्म हाऊस उभारण्यात आले. काहींनी नियमांचे पालन केले तर अनेकांनी एनए परवानगीवर फार्म हाऊस बांधले. महसूल विभागाने याबाबत तपासणी मोहीम सुरू केल्यास अनेकजण अडचणीत येऊ शकतात.