शेणगाव आरोग्य केंद्राच्या इमारतीत अवैध खत साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 05:00 AM2020-05-17T05:00:00+5:302020-05-17T05:00:54+5:30
धान्य पेरणीचा हंगाम जवळ येत आहे. एकीकडे शासन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर रासायनिक खताचा पुरवठा करीत आहेत तर दुसरीकडे साठेबाजीकरिता शेणगाव येथील शिव कृषी केंद्राचे १३०० बॅग रासायनिक खत चक्क आरोग्य केंद्राच्या नवनिर्मिती इमारतीत साठविले होते. गुप्त माहिती मिळताच जिवतीच्या तहसीलदारांनी धडक कारवाई करीत खतसाठा ताब्यात घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटण/जिवती : अतिदुर्गम म्हणून ओळख असलेल्या जिवती तालुक्यातील शेणगाव येथे खताचा अवैध साठा आढळला. कृषी केंद्र चालकाने काळाबाजारीकरिता चक्क शासकीय इमारतीचा वापर केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी उघडकीस आली.
धान्य पेरणीचा हंगाम जवळ येत आहे. एकीकडे शासन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर रासायनिक खताचा पुरवठा करीत आहेत तर दुसरीकडे साठेबाजीकरिता शेणगाव येथील शिव कृषी केंद्राचे १३०० बॅग रासायनिक खत चक्क आरोग्य केंद्राच्या नवनिर्मिती इमारतीत साठविले होते. गुप्त माहिती मिळताच जिवतीच्या तहसीलदारांनी धडक कारवाई करीत खतसाठा ताब्यात घेतला आहे. काळाबाजारीकरिता थेट शासकीय इमारतीचा आधार घेतल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता व कंत्राटदार एजन्सी यांची नेमकी भूमिका न समजणारी आहे. खतांची कमतरता दाखवून भाववाढीसाठी अवैध साठेबाजी तर करण्यात आली नाही ना, अशी शंका परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
तहसीलदारांच्या कारवाईने कृषी केंद्रचालकांचे धाबे दणाणले आहे. चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
आरोग्य केंद्राच्या इमारतीमध्ये रासायनिक खत कोणी ठेवले, मला याबाबत कुठलीही माहिती नाही. पत्रकारांनी फोन केल्यावर प्रकरण लक्षात आले. साईट इन्चार्जकडून माहिती घेऊन सदर रासायनिक खताचा साठा तात्काळ हटविण्यास सांगणार आहे.
-मेसर्स तिरूपती कन्स्ट्रक्शन
लॉकडाऊनमुळे शेणगाव आरोग्य केंद्राचे बांधकाम बंद आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून बांधकामास भेट दिली नाही. शासकीय इमारतीत अवैध रासायनिक खत साठविणे चुकीचे आहे. कंत्राटदार एजन्सीने कोणाच्या परवानगीने इमारत दिली, हे बघावे लागेल. मी रविवारी शेणगाव येथे जाऊन चौकशी करून कारवाई करणार आहे.
- राजकुमार गेडाम,
शाखा अभियंता, जिवती
शेणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम सुरू असताना सिमेंट बॅग ठेवण्याकरिता मी माझ्या मालकीचे गोदाम कंत्राटदाराच्या विनंतीवरून दिले होते. सध्या माझा कापूस निघाला नसल्याने गोदामात जागा नाही. त्यामुळे खत ठेवण्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची कंत्राटदाराला परवानगी मागितली आणि त्यांनी परवानगी दिली. त्यामुळे मी त्या ठिकाणी खत ठेवले.
- पृथ्वीराज खंडाळे, कृषी केंद्र चालक
शेणगाव आरोग्य केंद्राच्या इमारतीमध्ये अवैध रासायनिक खत साठविल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पंचनामा करून खतसाठा सील केला आहे. या संबंधाने शिव कृषी केंद्र चालकाला नोटीस बजाविली असून चौकशी करून यात जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई होणार आहे. शासकीय इमारतीत खतसाठा करणे बेकायदेशीर आहे.
-प्रशांत बेडसे पाटील, तहसीलदार, जिवती