दारूबंदी उठताच अवैध दारू सम्राट ग्रामीण भागात सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 05:00 AM2021-09-12T05:00:00+5:302021-09-12T05:00:30+5:30
तब्बल सहा वर्षे दारूबंदी कायम राहिली. या काळात नागपूर, पौनी, लाखांदूर, तसेच बाहेरील राज्यातून मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने दारू पुरवठा करण्यात येत होता. अनेक तरुण, महिला युवक, शाळकरी मुले या व्यवसायात जास्त पैसा मिळवण्याच्या लालसेने आपसूकच ओढल्या गेली होती. यात काही मोजक्या लोकांनी या व्यवसायात रग्गड पैसा कमावला, तर काही मोजके ठोक अवैध दारूचा व्यवसाय करणारे म्हणून नावारूपास आले होते. दारूबंदी हटताच यातील काही दारूसम्राट आता नव्याने रिचार्ज झाले आहेत.
दत्तात्रय दलाल
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : मागील महिन्यात जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्यात आली. परवाने नूतनीकरण करून अनेक बार व देशी भट्ट्या सुरू करण्यात आल्या. अवैध दारूचा व्यवसाय करणारे दारू सम्राट नव्याने रिचार्ज झाले असून, आता ते ग्रामीण भागात सक्रिय झाले आहेत. तालुक्यातील अनेक गावांत येथील एका भट्टीतून देशी दारूचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे दारूबंदीच्या काळात जेवढी दारू मिळत नव्हती, त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आता देशी दारू सहजपणे ग्रामीण भागात मिळत आहे.
मागील तत्कालीन शासनाने २०१५ मध्ये दारूबंदीची घोषणा केली. तेव्हापासून तब्बल सहा वर्षे दारूबंदी कायम राहिली. या काळात नागपूर, पौनी, लाखांदूर, तसेच बाहेरील राज्यातून मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने दारू पुरवठा करण्यात येत होता. अनेक तरुण, महिला युवक, शाळकरी मुले या व्यवसायात जास्त पैसा मिळवण्याच्या लालसेने आपसूकच ओढल्या गेली होती. यात काही मोजक्या लोकांनी या व्यवसायात रग्गड पैसा कमावला, तर काही मोजके ठोक अवैध दारूचा व्यवसाय करणारे म्हणून नावारूपास आले होते. दारूबंदी हटताच यातील काही दारूसम्राट आता नव्याने रिचार्ज झाले आहेत.
एका भट्टीतून देशी दारू मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात पोहोचविली जात आहे. पुरवठा करणाऱ्या जवळपास वीस ते पंचवीस जणांचा ताफा दिमतीला असून, अहोरात्र दारूचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात देशी दारू मिळत आहे. खुलेआम हा दारूपुरवठा केला जात असला तरी याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर अनेक कारवाया करण्यात आल्या आहेत. नव्याने अवैध दारूचा प्रकार आढळून आल्यास पोलीस प्रशासनाकडून निश्चितपणे कारवाई करण्यात येईल.
-रोशन यादव,
पोलीस निरीक्षक, ब्रह्मपुरी