खप वाढविण्यासाठी इलेक्ट्रिक बाइकमध्ये जीवघेणा बदल; चंद्रपुरात धक्कादायक प्रकार उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2022 01:35 PM2022-05-27T13:35:28+5:302022-05-27T13:50:24+5:30

ई-बाइक्समधील बॅटरीची परस्पर क्षमता वाढवून ताशी ५५ किलोमीटरपर्यंत गती वाढविली जात आहे. यामुळे वाहनाला आग लागून अपघात घडत आहेत.

illegal modifications to electric bikes to increase speed limit, causes vehicles to fire and accident | खप वाढविण्यासाठी इलेक्ट्रिक बाइकमध्ये जीवघेणा बदल; चंद्रपुरात धक्कादायक प्रकार उघडकीस

खप वाढविण्यासाठी इलेक्ट्रिक बाइकमध्ये जीवघेणा बदल; चंद्रपुरात धक्कादायक प्रकार उघडकीस

googlenewsNext
ठळक मुद्देचंद्रपुरात केलेली कारवाई महाराष्ट्रासाठी ठरलेले मोठे उदाहरण

राजेश भोजेकर

चंद्रपूर : पर्यावरणपूरक व कमी खर्चाची ई-बाइक बाजारात आलेली आहे. या बाइक्सचा खप वाढविण्यासाठी तिच्या बॅटरीची क्षमता परस्पर वाढविली जात आहे. यामुळे वाहनाला आग लागून अपघात घडत आहेत. खप वाढविण्याच्या या स्पर्धेत थेट ग्राहकांच्या जिवाची बाजी लावत असल्याचा हा धक्कादायक प्रकार येथील एका विक्रेत्यावर कारवाई करून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने उजेडात आणला.

राज्यातील विविध ठिकाणी ई-बाइक्सला आग लागल्याच्या घटना घडत आहेत. याबाबत परिवहन आयुक्तांनी सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी आभासी प्रणालीद्वारे संवाद साधून अलर्ट दिला आहे. यावेळी चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने ई-बाइकची गती वाढविणाऱ्या विक्रेत्यावर केलेल्या कारवाईची माहिती दिली.

ई-बाइक्स व वाहनातील हे बदल बेकायदेशीर

काही वाहन उत्पादक मान्यताप्राप्त संस्थेने दिलेल्या प्रमाणपत्राशिवाय ई-बाइक्सची विक्री करतात. तसेच अशा वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल करून बॅटरी क्षमता २५० वॉटपेक्षा जास्त करतात. यामुळे वाहनाच्या सुरक्षेला गंभीर धोका पोहचण्याची अधिक भीती आहे. ई-बाइक्सला आग लागून अपघात होत असल्याच्या घटना वारंवार पुढे येत आहे.

ही चाचणी आवश्यक

अशाप्रकारचे वाहन उत्पादन करणाऱ्या उत्पादकास वाहन विक्री करण्यापूर्वी त्या वाहन प्रकाराची चाचणी ही केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९च्या नियम १२६ मध्ये विहित केलेल्या मान्यताप्राप्त एआरएआय, आयसीएटी, सीआयआरटी या संस्थांकडून टाइप अप्रूअल टेस्ट रिपोर्ट घेणे अनिवार्य आहे.

ई-बाइक्सची वेगमर्यादा ताशी २५ किलोमीटरपेक्षा कमी

राज्य शासनाने पर्यावरणपूरक धोरण राबविण्याच्या अनुषंगाने ई-वाहन धोरण-२०२१ लागू केलेले आहे. ई-बाइक्स व ई-वाहन यांना मोटार करातून धोरण कालावधीसाठी १०० टक्के सूट दिलेली आहे. या अनुषंगाने राज्यात ६६ हजार ४८२ इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची नोंदणी झालेली आहे. केंद्रीय मोटार नियम १९८९च्या नियम २ (यू) मध्ये बॅटरी ऑपरेटेड व्हेइकलची व्याख्या दिली आहे. यानुसार २५० पेक्षा कमी क्षमता असलेल्या तसेच ज्या वाहनांची वेग मर्यादा ताशी २५ किलोमीटरपेक्षा कमी आहे, अशा ई-बाइक्सना नोंदणीपासून सूट आहे.

ई-बाइक्समध्ये गती वाढविण्यासाठी तिच्या बॅटरीमध्ये केलेल्या बेकायदेशीर बदलाबाबत केलेली कारवाई राज्यात महत्त्वाची ठरली आहे. आता अशा कारवाया राज्यभरात करण्याच्या सूचना परिवहन आयुक्तांनी दिलेल्या आहेत.

किरण मोरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर

Web Title: illegal modifications to electric bikes to increase speed limit, causes vehicles to fire and accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.