आवळगाव घाटावरून अवैध रेतीचे उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:26 AM2021-02-14T04:26:18+5:302021-02-14T04:26:18+5:30
गांगलवाडी : या भागातील आवळगाव घाटावरून ट्रकद्वारे रात्रंदिवस रेतीचे मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन होत असून, याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत ...
गांगलवाडी : या भागातील आवळगाव घाटावरून ट्रकद्वारे रात्रंदिवस रेतीचे मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन होत असून, याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
या भागात मुरूम मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून, त्याच प्रमाणात या मुरुमाची अवैधरीत्या वाहतूक केल्या जात आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. या भागात उपलब्ध असलेल्या गौण खनिजामुळे शासनाला लाखो रुपये उत्पन्न मिळू शकते. परंतु, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हे गौण खनिज चोरीला जात असून, या भागातील हे गौण खनिजचोर लाखपती बनले आहेत. शासनाचे मात्र लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या भागात लक्ष घालून या गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून केली जात आहे.
तसेच या भागातून वैनगंगा नदी वाहत असल्यामुळे या भागात रेतीदेखील मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी या भागात मोठ्या प्रमाणात रेती तस्कर निर्माण झाले आहेत . त्यांच्याद्वारे रात्री १२ वाजतापासून तर पहाटे ६ वाजेपर्यंत नदीतील रेतीची चोरी केली जाते. परंतु या रेती चोरांकडेदेखील या तालुक्यातील अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. या भागात सर्वात जास्त रेती चोरी चिचगाव, आवळगाव, हलदा, बोळधा या घाटांवरून होत असून, या भागातील रेती चोरी कारणाऱ्यांचे त्वरित मुस्के आवळावेत, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.