भिसी वनक्षेत्रातून सागाची अवैध तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 06:00 AM2020-01-01T06:00:00+5:302020-01-01T06:00:17+5:30
चिमूर तालुक्यात मोठया प्रमाणात जंगल क्षेत्र आहे. या जंगलात सागवान झाडांचे प्रमाण जास्त आहे. बांधकाम व गृह उपयोगी वस्तुकरिता सागाचे लाकूड वापरल्या जात असल्याने या लाकडांची मागणी खूप आहे. त्यामुळे वनविभागाच्या राखीव क्षेत्रातून सागवान झाडांची कत्तल करून रात्री त्याची वाहतूक करण्यात येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : तालुक्यातील राखीव वनक्षेत्रातून मोठया प्रमाणात होणाऱ्या साग झाडांच्या तस्करीवर आळा घालण्याकरिता वनविकास महामंडळाने विशेष पथकाच्या रात्रीच्या गस्त वाढविलेल्या आहेत. रात्रपाळी गस्तीवर पथक असताना सोमवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान भिसी ते जांभूळविहिरा रोडवर अवैधरित्या साग झाडांची तोड करून त्याची वाहतूक ट्रॅक्टरने करीत असल्याचे आढळले. ट्रक्टर भरून सागाची तस्करी करणारे ट्रक्टर व सहा लाखाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. या आठ आरोपीना अटक करण्यात आली.
चिमूर तालुक्यात मोठया प्रमाणात जंगल क्षेत्र आहे. या जंगलात सागवान झाडांचे प्रमाण जास्त आहे. बांधकाम व गृह उपयोगी वस्तुकरिता सागाचे लाकूड वापरल्या जात असल्याने या लाकडांची मागणी खूप आहे. त्यामुळे वनविभागाच्या राखीव क्षेत्रातून सागवान झाडांची कत्तल करून रात्री त्याची वाहतूक करण्यात येते. यावर अंकुश ठेवण्याकरिता वनविकास विभागाचे विशेष पथक तयार करून त्यांच्या रात्रीच्या गस्ती वाढविल्या आहेत.
या पथकाद्वारे भिसी - जांभुळविहीरा रोडवर गस्त सुरू असताना रात्री १० वाजताच्या सुमारास संशयास्पद ट्रॅक्टरची (क्रमांक एमएच ३४ एल ७३३८) तपासणी केली असता अवैध सागाची वाहतूक करीत असल्याचे आढळले.
ट्रॅक्टरमध्ये सागाचे ४२ नग (१.६२६ घमी), ज्याची बाजार किंमत जवळपास एक लाख आणि ट्रॅक्टर किंमत पाच लाख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच आरोपी दिनेश वासुदेव दिघोरे रा. भिसी व त्याचे इतर सात सहकाऱ्यांना अटक करण्यात आली. सदर प्रकरणात आरोपीवर भारतीय वन अधिनियम १९२७ कलम ५२ (१) (१अ) ४१ (१)(२)(ड)(इ) तसेच महाराष्ट्र झाड तोडणे अधिनियम १९६४ कलम ५(२) प्रमाणे वन गुन्हाची नोंद करण्यात आली. आरोपी व ट्रॅक्टरला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कार्यवाही विशेष पथकाचे प्रमुख वन परिमंडळ अधिकारी रमेश बलैया, क्षेत्र सहायक आशिष बायस्कर, वनरक्षक आर.पी. आगोसे, चव्हाण, घुठे यांनी पार पाडली. वनाधिकाऱ्यांनी अटक केलेल्या आरोपींना चिमूर न्यायालयात हजर केले.
पुढील तपास पश्चिम चांदा वनप्रकल्प विभागाचे विभागीय वनाधिकारी विवेक मोरे, सहायक व्यवस्थापक सुनील आत्राम तसेच वनपरिक्षेत्राधिकारी ऋतुराज बारटक्क्के यांच्या मार्गदर्शनाखाली वनाधिकारी तपास करत आहेत.