चिरोली परिसरात रेतीची अवैध वाहतूक
By admin | Published: November 10, 2016 02:02 AM2016-11-10T02:02:23+5:302016-11-10T02:02:23+5:30
तालुक्यातील चिरोली व सुशी येथील नदीतून रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध रेतीची वाहतूक केली जात आहे.
मूल : तालुक्यातील चिरोली व सुशी येथील नदीतून रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध रेतीची वाहतूक केली जात आहे. या वाहतुकीमुळे चिरोली येथील नागरिक त्रस्त असून होणारी रेतीची अवैध वाहतून थांबवावी, असी मागणी नागरिकांनी केली आहे.
चिरोली-केळझर व मूल-पोंभूर्णा मार्गावर सुशी जवळ अंधारी नदी असून या नदीमधील रेती चिरोली व परिसरातील काही ट्रॅक्टरधारकांनी रात्री ८ वाजतापासून अवैध वाहतूक करीत आहेत. सदर बाब चिरोलीच्या तलाठ्याला माहित आहे. मात्र त्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबत मूल येथील महसूल विभागाच्या काही अधिकाऱ्यांना काही दिवसांपुर्वी चिरोली येथील नागरिकांनी भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. परंतु तलाठीच मुख्यालयी राहत नसल्याचे कारण समोर करून मूल येथील महसूल विभागाचे अधिकारी आले नाही. यामुळे रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांचे चांगलेच फावत आहे.
केळझर येथील तलाठी हे चंद्रपूरवरून ये-जा करतात. त्यामुळे केळझर येथे मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिजाचे उत्खनन होत आहे. याकडे आता तालुका प्रशासनानेच लक्ष देण्याची गरज आहे.
कंत्राटदारानी बांधकाम करताना गौण खनिजाची कपात करण्यात येणाऱ्या स्वामित्वधनाचे अनुषंगाने गौण खनिजाच्या जावक पावती पडताळणी करण्याचे आदेश २७ जानेवारी रोजी जिल्हा प्रशासनाने काढले. या आदेशामुळे शासनाचा महसूल नक्कीच वाढेल. परंतु खाजगी घराचे बांधकाम करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गौण खनिजाचे काय, याचाच फायदा घेत अवैध रेतीची वाहतूक रात्रीच्या सुमारास केली जात आहे. याकडे तालुका प्रशासनाने लक्ष देऊन चिरोली येथील नागरिकांना होणारा त्रास थांबवावा, अशी मागणी चिरोली येथील नागरिकांनी केली आहे.
या अवैध वाहतुकीमुळे शासनाचा करोडो रूपयाचा महसूल बुडत असून रेती तस्कर गब्बर होत चालले आहेत. त्यांना वटणीवर आणण्यासाठी महसूल प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)