चंद्रपूर जिल्ह्यात घुसखोरी केल्यास कायदेशीर कार्यवाही होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 07:51 PM2020-04-17T19:51:25+5:302020-04-17T19:51:47+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून वा राज्यातून छुप्या मार्गाने घुसखोरी करणाऱ्यांना आता कायदेशीर कार्यवाहीला सामोरे जावे लागणार आहे, असे आदेशच जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी शुक्रवारी निर्गमित केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून वा राज्यातून छुप्या मार्गाने घुसखोरी करणाऱ्यांना आता कायदेशीर कार्यवाहीला सामोरे जावे लागणार आहे. असे आदेशच जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी शुक्रवारी निर्गमित केले आहे. यामुळे आता बाह्य घुसखोरीला आळा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
‘बाह्य घुसखोरांमुळे चंद्रपूर जिल्ह्याला धोका’ अशा शिर्षकाखाली शुक्रवारी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताला जिल्हा प्रशासनाने अतिशय गांभिर्याने घेतले आहे. इतकेच नव्हे तर याबाबत आदेशच काढले आहे. परराज्यात छुप्या मार्गाने चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाल्यास संबंधित व्यक्तीने याबाबतची सूचना जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणेस देण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित व्यक्तीची आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ४३ अन्वये आणि भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये कार्यवाही करण्यात येणार आहे.
जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेमुळे चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. परिणामी चंद्रपूर जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. अशातच लॉकडाऊनमुळे मुंबई, पुण्यासह बाहेर जिल्ह्यात व बाहेर राज्यात अडकलेली मंडळी पोलीस प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घुसखोरी करीत आहेत. यामुळे आरोग्य विभागापुढे नवे आव्हान उभे ठाकले आहे, ही बाब ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.
या सोबतच क्वारंटाईन व्यक्तींनाही महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. या व्यक्तीने इतर व्यक्तीशी संपर्क टाळावा. दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असेही आदेशात म्हटले आहे.