दारूची अवैध वाहतूक होते, पोलीसच करतात मान्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 01:43 PM2021-11-29T13:43:18+5:302021-11-29T15:39:30+5:30
रविवारी एका छापेमारीत पोलिसांनी ४८ पेटी देशी दारु व एक चारचाकी वाहन जप्त केले. प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या कारवाईच्या माहिती अखेर तालुक्यात व गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती समोर येत असल्याचेही पत्रकात नमूद आहे.
दत्तात्रय दलाल
चंद्रपूर : जिल्ह्यातील करण्यात आलेली दारूबंदी काही महिन्यांपूर्वी हटविण्यात आली. काही मोजक्या देशी दारूच्या दुकानातून तालुक्यात व लगतच्या गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारूची वाहतूक होत आहे. दरम्यानच्या कालावधीत अनेक कारवाया पोलीस विभागाकडून करण्यात आल्या आहेत.
रविवारी एका छापेमारीत पोलिसांनी ४८ पेटी देशी दारु व एक चारचाकी वाहन जप्त केले. प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या कारवाईच्या माहिती अखेर तालुक्यात व गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती समोर येत असल्याचेही पत्रकात नमूद आहे. त्यामुळे कायद्यानुसार कारवाई व कायद्याची ठोस अंमलबजावणी होणार काय, असा प्रश्न जनसामान्य विचारत आहेत.
नुकतेच तालुक्यातील दारु दुकाने सुरु झाली आहेत. यातील काही मद्य सम्राट नव्याने सरसावले असून मोठ्या प्रमाणात अवैध दारू वाहतूक करण्यात येत असल्याचे वास्तव दिसून येत आहे. तालुक्यातच नव्हे तर, लगतच्या गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारुसाठा पोहचविण्यात येत आहे. रात्रीच्या अंधारात शहरातील विविध भागातून वाहने पोहचवली जात आहेत. पोलिसांचा रात्री खडा पहारा, विविध ठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे असताना हा दारूसाठा व वाहने कशी काय बाहेर काढली जातात, असा प्रश्न निर्माण होत आहे. पोलिसांना छापेमारीत मोठ्या प्रमाणात दारूसाठा मिळाल्याचे पोलीस विभागाने वेळोवेळी दिलेल्या पत्रकात नमूद आहे.
सप्टेंबर महिन्यात ३६ कारवाया
सप्टेंबर महिन्यात एकूण ३६ कारवाया पोलिसांनी केल्या असून त्यात आठ लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी छापेमारीत पकडलेल्या दारूच्या पेटीवर बॅच नंबर असतो. त्यानुसार कोणत्या परवानाधारक दारू दुकानातून अवैध दारूची वाहतूक करण्यात येते. हे स्पष्ट होते. मात्र, पोलिसांकडून उचित कारवाई करण्यात येत नाही. केवळ वाहतूक करणाऱ्या विरोधात कारवाई करून पोलीस मोकळे होतात.
परवानाधारक दुकानांवर कारवाई होणे गरजेचे
दारूबंदी कायद्यानुसार आस्थापनांवर रितसर कारवाई करण्याची तरतूद आहे. मात्र, काही जबाबदार अधिकारी चिरीमिरी घेऊन प्रकरण दडपत असल्याचा आरोप जनसामान्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मुळात अशी वाहतूक व अवैध दारू पकडल्यास संबंधित परवानाधारक दुकानावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.