आयएमए देणार आठवड्यातून एक दिवस मोफत रुग्णसेवा; नवनिर्वाचित अध्यक्ष घाटे यांचा संकल्प : हजारो रुग्णांना होणार लाभ
By साईनाथ कुचनकार | Published: April 23, 2024 03:01 PM2024-04-23T15:01:42+5:302024-04-23T15:04:37+5:30
Chandrapur : आठवड्यातून एक दिवस मोफत रुग्णसेवा देण्याचा आयएमएने केला संकल्प; रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजकारण करण्याचे आवाहन
चंद्रपूर : ग्रामीण भागातील रुग्णांना आठवड्यातून एक दिवस मोफत रुग्णसेवा देण्याचा आयएमएने संकल्प केला आहे. यासंदर्भात नवनियुक्त अध्यक्ष डाॅ. संजय घाटे यांनी यांसदर्भात घोषणा केली आहे. या संकल्पामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
आयएमए चंद्रपूरच्या नवीन कार्यकारणीचा पदग्रहण समारंभ रविवार दि. २१ एप्रिल रोजी चंद्रपूर येथील आयएमए सभागृहात पार पडला. याप्रसंगी डाॅ. घाटे यांनी याबाबत उपस्थितांना माहिती दिली.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्पेशलिस्ट डॉक्टरांची अत्यंत गरज आहे. त्यामुळे लॅप्रोस्कोपी तज्ज्ञ व किडनी सर्जन म्हणून आठवड्यातून एक दिवस जिल्हा शल्य चिकित्सकांच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालयात आपल्या सेवा मोफत तेथे जाऊन देऊन असा संकल्पही त्यांनी केला.
आयएमएच्या समारंभाकरिता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष धोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रंसगी आयएमएचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे प्रशासक डॉ. विंकी रुगवानी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्या हस्ते डॉ. संजय घाटे व त्यांच्या कार्यकारिणीने पदभार घेतला.
प्रसंगी बोलताना आयएमएचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी डॉक्टरांच्या समाजाबद्दल तसेच समाजाच्या सुद्धा डॉक्टरांबद्दलच्या कर्तव्यांची जाणीव करून दिली. डॉ. रुघवाणी यांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या रुग्ण व डॉक्टर यांच्यामधील समन्वयतेच्या बद्दलची व कौन्सिलच्या कार्याची माहिती दिली.
याप्रसंगी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार सुभाष धोटे यांनी डॉ. संजय घाटे यांनी ग्रामीण रुग्णांसाठी घेतलेल्या संकल्पाची प्रशंसा केली. जास्तीत जास्त डॉक्टरांनी अशा प्रकारे रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजकारण करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला आयएमएचे सर्व डॉक्टर्स, शहरारातील नागरिकांची उपस्थिती होती.
अशी आहे कार्यकारिणी
अध्यक्ष डाॅ. संजय घाटे, सचिव डॉ. प्रवीण पंत, कोषाध्यक्ष डॉ. अप्रतिम दीक्षित, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद पोटदुखे, डॉ. अमित देवईकर, डॉ. नगिना नायड, डॉ. किरण जानवे, सहसचिव डॉ. वंदना रेगुंडवार, डॉ. वीरेंद्र कोल्हे, डॉ. सौरभ निलावार, डॉ. सुश्रुत भुक्ते, डॉ. रोहन कोटकर, महिला डॉक्टर विंगच्या चेअर पर्सन म्हणून डॉ. अपर्णा देवईकर, कोचेअर पर्सन डॉ. पूनम नगराळे, सचिव डॉ. समृद्धी आईचवार, पुढील वर्षीचे अध्यक्ष म्हणून डॉ. रितेश दीक्षित यांनी पदभार स्वीकारला.