नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:29 AM2021-07-27T04:29:22+5:302021-07-27T04:29:22+5:30
काँग्रेस कमिटीचे तहसीलदारांना निवेदन राजुरा : राजुरा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील कापूस, ...
काँग्रेस कमिटीचे तहसीलदारांना निवेदन
राजुरा : राजुरा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील कापूस, सोयाबीन, तूर, धान अशा अनेक शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. अनेक नागरिकांच्या राहत्या घरात पावसाचे पाणी जाऊन घरातील जीवनावश्यक वस्तूंची नासधूस झाली. अनेक ठिकाणी राहती घरे कोसळली. जनावरांना क्षती पोहोचली, त्यांचा चारासुद्धा खराब झाला. वेकोलीच्या कोळसा खाणीच्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे, तसेच नाले प्रभावित झाल्यामुळे परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी साचले व मोठी हानी झाली. नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेस कमिटीने तहसीलदारांना निवेदन देऊन केली.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व खरीप शेतीचे तातडीने पिकांचे पंचनामे करून एनडीआरएफ व एसडीआरएफच्या निकषावर शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. आधीच शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन पिकांची लागवड केली होती. पिकेही चांगली होती; परंतु निसर्गाने शेतकऱ्यांना पुन्हा चिंतेच्या आणि कर्जाच्या खाईत लोटले आहे, तसेच अनेकांच्या घरांचे, जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले. जनावरे पुरामध्ये वाहून गेली. अशा स्थितीत सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत करावी, तसेच पुरामुळे रस्ते, छोटे पूल क्षतिग्रस्त झाले आहेत त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे यांनी राजुराचे तहसीलदार हरीश गाडे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भातील एक निवेदन तालुका कृषी अधिकारी राजुरा यांनाही देण्यात आले आहे. याप्रसंगी राजुरा तालुका काँग्रेसच्या शिष्टमंडळात नगराध्यक्ष अरुण धोटे, राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, सभापती मुमताज जावेद अब्दुल, उपसभापती मंगेश गुरनुले, पं.स. सदस्य कुंदा जेणेकर, तुकाराम माणुसमारे, महिला काँग्रेस शहराध्यक्ष तथा नगरसेविका संध्या चांदेकर, हरिचंद्र जुनघरी, शिवराम लांडे, अविनाश जेनेकर, रामभाऊ ढुमने, कवडू सातपुते, विकास देवाडकर आदी उपस्थित होते.
260721\img-20210726-wa0183.jpg
फोटो