मान्सूनपूर्व कामांची तत्काळ अंमलबजावणी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:29 AM2021-05-18T04:29:38+5:302021-05-18T04:29:38+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यातील मान्सून परिस्थितीचे आकलन करून कोरोना विषाणू व पाऊस या दोन्हीमुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीमध्ये सर्व विभागांनी समन्वयाने ...
चंद्रपूर : जिल्ह्यातील मान्सून परिस्थितीचे आकलन करून कोरोना विषाणू व पाऊस या दोन्हीमुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीमध्ये सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे तसेच तालुकास्तरावर आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिल्या. मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेताना सोमवारी ते बोलत होते.
यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेश सुरवाडे व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, पावसाळ्यात येणाऱ्या वादळामुळे झाडे रस्त्यावर उन्मळून पडतात. त्यासाठी बांधकाम विभाग व नॅशनल हायवे अॅथॉरिटीने याबाबत दक्षता घ्यावी, मुख्य रस्त्यावरून ऑक्सिजन सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टँकरला अडथळा निर्माण होणार नाही, याकडे विशेष लक्ष द्यावे. वीज वितरण कंपनीने पथक सज्ज ठेवावे. रुग्णालयात कोरोना बाधित रुग्ण असल्याने वीज पुरवठा अबाधित राहावा, यासाठी रुग्णालयाने बॅकअप इलेक्ट्रिकल्स, जनरेटरची पूर्तता करून ठेवावी. पाटबंधारे विभागाने सर्व धरणांची तपासणी करून गळती दुरुस्तीची कार्यवाही करावी. पूरबाधित संभाव्य गावांची यादी तयार करून आपत्ती व्यवस्थापन कक्षात सादर करण्याच्या सूचना दिल्या. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्राने इरई धरणाचे गेट उघडताना नागरिकांना अलर्ट करण्याची यंत्रणा उभारावी. धोकादायक पुलांचा अहवाल सादर करावा, याकडेही जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी लक्ष वेधले.
रुग्णवाहिका सज्ज ठेवा
आपत्तीच्या काळात रुग्णवाहिका आराखडा व ट्रोल फ्री क्रमांक कार्यान्वित करावा, रुग्णवाहिकांची तपासणी करावी. आरोग्य विभागाने पुरेसा औषधी साठा उपलब्ध करून ठेवावा. पालिका हद्दीतील जुन्या इमारतींची पावसाळ्यापूर्वी तपासणी करावी. तालुका व ग्रामस्तरीय समितीच्या मान्सूनपूर्व बैठका घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी संबंधित विभागाला दिल्या. झूम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तालुका अधिकाऱ्यांशी संवाद साधून अलर्ट राहावे व मुख्यालय सोडू नये, असे निर्देश दिले.