संतोषसिंह रावतांवरील हल्लेखोरांना तात्काळ अटक करुन अहवाल द्या; सुधीर मुनगंटीवारांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश
By राजेश भोजेकर | Published: May 19, 2023 04:10 PM2023-05-19T16:10:19+5:302023-05-19T16:10:34+5:30
पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांना हल्लेखोरांना तात्काळ अटक करून तसा अहवाल पाठविण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले आहेत.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्यावर ११ मे रोजी रात्री ९:१९ वाजता मूल शहरात अज्ञात हल्लेखोरांनी बंदुकीतून गाेळी झाडून गंभीर स्वरुपाचा हल्ला केला. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अद्यापही अपयश आले नाही. याप्रकरणाला जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही गांभिर्याने घेतले आहे.
पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांना हल्लेखोरांना तात्काळ अटक करून तसा अहवाल पाठविण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले आहेत. यामुळे आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. मुनगंटीवार यांनी पोलिस अधीक्षक परदेशी यांना दिलेल्या आदेशात आरोपींना अटक करण्यात यावी, याबाबत दूरध्वनीवरून वारंवार सूचना करण्यात आल्याचे नमुद केले आहे. मात्र याप्रकरणात अद्यापही आरोपींपर्यंत पोलिस पोहचले नाही. आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. तसेच याबाबतचा अहवाल आपणाला सादर करावा, असे स्पष्ट निर्देशच मुनगंटीवार यांनी पोलिस अधीक्षकांना दिले आहे.
११ मे रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत हे सायंकाळी मूल येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत गेले होते. तेथून आपल्या दुचाकीने बाहेर पडल्यानंतर काहीच अंतरावर हल्लेखार कारने तेथे आधीच येऊन होते. संतोषसिंह रावत हे तेथे उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाजवळून जात असताना अचानक चेहऱ्यावर नकाब असलेला हल्लेखोर कारमधून बाहेर आला. त्याने काहीही कळायच्या आत संतोषसिंह रावत यांच्या दिशेने बंदुक रोखून गोळी झाडली.
हल्ला होत असल्याचे लक्षात येताच रावत हे दुचाकीवरच वाकल्याने बंदुकीची गोळी त्यांच्या डाव्या हाताच्या भुजाला चाटून गेल्याने या गंभीर स्वरुपाच्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. या घटनेचा तपास पोलिस करीत आहेत. मात्र त्यांना अद्यापही हल्लेखोर सापडले नाही. याप्रकरणी हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश ना. मुनगंटीवार यांनी पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. इतकेच नव्हे तर तसा अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिलेले आहेत.