जीवघेण्या कीटकनाशकांवर तत्काळ बंदी घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 11:51 PM2017-10-10T23:51:02+5:302017-10-10T23:51:19+5:30
कापसावर कीटकनाशकांची फवारणी करताना विदर्भात झालेले शेतकºयांचे मृत्यू, हे अत्यंत वेदनादायी घटना आहेत. अशा दुर्घटनांवर त्वरित प्रतिबंध घालण्यासाठी व अशा घटना भविष्यात घडणार नाही यासाठी,....
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कापसावर कीटकनाशकांची फवारणी करताना विदर्भात झालेले शेतकºयांचे मृत्यू, हे अत्यंत वेदनादायी घटना आहेत. अशा दुर्घटनांवर त्वरित प्रतिबंध घालण्यासाठी व अशा घटना भविष्यात घडणार नाही यासाठी, ज्या कीटकनाशकांमुळे शेतमजुरांना मृत्यूस सामोरे जावे लागले, अशा सर्वच विषारी कीटकनाशकांवर तत्काळ बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारचे परिपत्रक काढू, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.
वरिष्ठ कृषी आणि कापूस वैज्ञानिकांसोबत नागपूर येथे पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते. नागपुरातील रवि भवन येथे पार पडलेल्या या बैठकीस केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचे वैज्ञानिक डॉ. वाघमारे, आरोग्य उपसंचालक डॉ. जयस्वाल व अन्य वैज्ञानिक, तज्ज्ञांची उपस्थिती होती.
कीटकनाशकांमुळे मृत्यू झालेल्या शेतकºयांच्या पीडित कुटुंबीयांना भरीव मोबदला दिला जाईल, याकरीता केंद्र सरकारकडे मोबदल्यात वृद्धी करण्याबाबत शिफारस करू, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले.
मनुष्याकरिता घातक असलेल्या विषारी कीटकनाशकांची प्रतवारी ठरवून तशी यादी तयार करावी व ही कीटकनाशके विक्रीकरीता उपलब्ध असल्यास ती संबंधित दुकाने व कृषी केंद्राकडून त्वरित हटविण्याची कार्यवाही होईल या अनुषंगाने गांभीर्याने दखल घ्यावी, असेही निर्देश ना. अहीर यांनी दिले.
कापसाच्या वाढीबाबत बोलताना या पिकांची उंची वाढली. मात्र बोंडांची संख्या अल्प प्रमाणात का, याचेही संशोधन व त्यामागील कारणे वैज्ञानिकांनी शोधावीत. जेणेकरून शेतकºयांना उत्तम पिकासाठी वारंवार कीटकनाशक फवारणी करण्याची वेळ उद्भवणार नाही व अशा परिस्थितीत कोणते उपाय अंमलात आणून मुबलक पीक घेण्याकरिता कृषी विभागाच्या माध्यमातून उचित मार्गदर्शन व्यवस्था निर्माण करण्याच्या गरजेवरही केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये अधिकाºयांना सांगितले.