घोडाझरीचा फुटलेला नहर त्वरित दुरूस्त करा - अविनाश वारजुकर
By admin | Published: October 5, 2015 01:32 AM2015-10-05T01:32:38+5:302015-10-05T01:32:38+5:30
धानाचे पीक अंतिम टप्प्यात आले असताना ऐनवेळी घोडाझरी तलावाचा नहर फुटला. त्यामुळे या तलावावर अवलंबून असलेली १५०० एकर शेती संकटात सापडली आहे.
नागभीड : धानाचे पीक अंतिम टप्प्यात आले असताना ऐनवेळी घोडाझरी तलावाचा नहर फुटला. त्यामुळे या तलावावर अवलंबून असलेली १५०० एकर शेती संकटात सापडली आहे. फुटलेला नहर त्वरित दुरूस्त करून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्या अन्यथा घोडाझरी तलावाच्या कार्यालयाला कुलुप ठोकू, असा इशारा माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर यांनी दिला आहे.
घोडाझरी तलावाला १०७ वर्षाचा इतिहास आहे. आजही या तलावाचे आणि नहराचे काम मजबुत आहे. मात्र दोन वर्षाअगोदर नहराच्या लाईनिंगचे काम ज्या ठिकाणी करण्यात आले नेमका त्याच ठिकाणी नहर फुटला. यावरून अधिकारी आणि कंत्राटदार यांनी हे काम कशाप्रकारे केले असेल याची कल्पना येते. या संपुर्ण कामाची चौकशी करून दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई करावी, अशी मागणीही डॉ. वारजुकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे.
सद्यस्थितीत धानाचे पीक अंतिम टप्प्यात आले आहे. या काळात धानपीकाला पाण्याची नितांत गरज असते. नदी नाल्याला पाणीच नसल्याने सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाअभावी धान पिकाचे उत्पन्न घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शेतकऱ्यांची आणि धानपिकाची गरज लक्षात घेवून विभागाने त्वरीत या नहराची दुरूस्ती करावी व शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही वारजुकर यांनी केली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी आपआपल्या समस्या डॉ. वारजुकर यांचेकडे मांडल्या.
नरहाला दिलेल्या भेटीच्यावेळी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रफुल्ल खापर्डे, जि.प. सदस्या पद्माताई कामडी, प्रमोद चौधरी, आनंद भरडकर, मधुकर बावणकर, प्रतिक भसीन आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)