वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका; चंद्रपूर केंद्राची वीज निर्मिती निम्म्यावर
By राजेश भोजेकर | Published: January 4, 2023 02:36 PM2023-01-04T14:36:57+5:302023-01-04T14:39:36+5:30
Mahavitaran Employee Strike : अनेक भागात वीज पुरवठ्यावर परिणाम
चंद्रपूर :चंद्रपूर वीज निर्मिती केंद्राचे कर्मचारी, अभियंता, अधिकारी खासगीकरणाच्या विरोधात संपावर गेल्याने वीज निर्मिती प्रभावीत झाली असून 2920 मेगावॉट वीज निर्मितीची क्षमता असलेल्या चंद्रपूर वीज केंद्राची वीज निर्मिती निम्म्यावर आली आहे.
चंद्रपूर वीज निर्मिती केंद्रात 11 लाख 76 हजार टन एवढा भरमसाठ कोळशाचा साठा आहे. मात्र कर्मचारीच संपावर असल्याने याचा फटका वीज केंद्राला बसत आहे. मंगळवारी 210 मेगावॉटचा तिसरा व पाचशे मेगावॉटचा चौथा, पाचवा, सहावा, आठवा व नवव्या संचातून सुरळीत वीज निर्मिती सुरू होती. केवळ पाचशे मेगावॉटचा सातवा संच बंद होता. दरम्यान मंगळवारी संप कालावधीत 500 मेगावॉटचा चौथा व पाचवा संच बंद झाला.
सध्या चंद्रपूर वीज निर्मिती केंद्रात पाचशे मेगावॉटचे तीन संच बंद असल्याने यातून होणारी वीज निर्मिती ठप्प आहे. येथे सुरू असलेल्या संच क्रमांक तीन, सहा, आठ व नऊ या चार संचातून अनुक्रमे 108, 338, 406, 409 अशी एकूण केवळ 1271 मेगावॉट एवढीच वीज निर्मिती सुरू आहे.
Mahavitaran Strike | चंद्रपूर जिल्ह्यातील साडेआठ हजार वीज कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर
210 मेगावॅटचे तीन व चार व पाचशे मेगावॉटचे पाच, सहा, सात, आठ, नऊ असे एकूण सात संच असलेल्या चंद्रपूर वीज केंद्राची 2920 मेगावॉट वीज निर्मितीची क्षमता आहे. मात्र संप काळात येथील वीज निर्मिती निम्म्यावर आली आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागात बत्ती गुल होण्याची आशंका निर्माण झाली आहे. असाच संप सुरू राहिलास राज्यात काही भागात काळोख पसरण्याची दाट शक्यता आहे.