अविरत संघर्षाची फलश्रुती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 11:19 PM2018-04-27T23:19:18+5:302018-04-27T23:19:18+5:30
घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. पण आयुष्यात काहीतरी करून दाखविण्याची मनात जिद्द. काय करावे..असा प्रश्न डोक्यात रुंजी घालत असतानाच स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली. शिकवणी लावायला हाती पैसे नाही. तरीही तो हरला नाही.
परिमल डोहणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. पण आयुष्यात काहीतरी करून दाखविण्याची मनात जिद्द. काय करावे..असा प्रश्न डोक्यात रुंजी घालत असतानाच स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली. शिकवणी लावायला हाती पैसे नाही. तरीही तो हरला नाही. अविरत संघर्ष सुरू ठेवला अन् महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या कर सहायक परीक्षेत अनुसुचित जातीमधून तो १७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याच्या अविरत संघर्षाची ही फलश्रुतीच ठरली.
मनात प्रबळ इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असल्यास कोणतेही दिव्य पार करता येते. हीच बाब सावलीतील निलीम मोतीलाल दुधे यांनी सिद्ध करुन दाखविली. सध्या निलीम हा नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात कक्ष सहायक या पदावर कार्यरत आहे.
निलीम हा मुळचा सावलीचा रहिवासी. वडील राजकारणात सक्रीय, आई गृहिणी तर बहीण जिवती येथे अधीक्षक पदावर कार्यरत आहे. पण आपल्या मुलाने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी व्हावे, हे निलीमच्या वडिलाचे स्वप्न. आणि निलीमने एमपीएससीद्वारे नुकतीच कर सहायक पदाची परीक्षा उत्तीर्ण करुन आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे.
निलीमचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सावली येथेच झाले. त्यानंतर त्याने गडचिरोली येथील शासकीय डीटीएड कॉलेजमध्ये डीटीएडचे शिक्षण घेतले. मात्र त्याच काळात शिक्षक भरती बंद झाल्यामुळे त्याने चंद्रपूर गाठून डॉ. आंबेडकर महाविद्यालयात इंग्रजी वाङ्मयात बीएला प्रवेश घेतला. आणि याच वेळेस त्याची खऱ्या अर्थाने स्पर्धा परीक्षेला सुरुवात झाली. मात्र स्पर्धा परीक्षा ही केवळ महागडे शिकवणी वर्ग लावूनच उत्तीर्ण होता येते, असा सर्वसाधारण समज. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तो शिकवणी लावू शकला नाही. अभ्यासात काही अडचणी आल्यास त्या स्वत:च सोडवायचा. चंद्रपूर येथील वाचनालयात नियमित जायचा. १० ते १२ तास अभ्यास एके अभ्यास, असेच सुरू होते. या कालवधीत त्याने ग्रामसेवक, एमपीएसी एसटीआय, शिक्षक भरती, तलाठी, युपीएससी यासारख्या अनेक परीक्षा दिल्या. अखेर २०१७ ला लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या कर सहायक परीक्षेत त्याने यश मिळविलेच.
वडेट्टीवार यांच्या हस्ते सत्कार
प्रतिकूल परिस्थितीत दिवसातून १० ते १२ तास अभ्यास करुन एमपीएससीतर्फे घेतलेल्या कर सहायक परीक्षेत निलीम दुधे उत्तीर्ण झाल्याची माहिती आमदार विजय वडेट्टीवार यांना मिळताच त्यांनी सावली येथे त्याच्या घरी जाऊन त्याचा व त्याच्या यशात मोलाचा वाटा उचलणाºया आईवडिलांचा गुरुवारी सत्कार केला. यावेळी दिनेश चिटनूरवार, उपनगराध्यक्ष विलास यासलवार, विलास मुत्यलवार, गटनेता छत्रपती गेडाम, नितिन दुव्वावार, संदीप पुण्यपकार, मोहन गाडेवार, निखिल सुरमवार उपस्थित होते.