‘खेळामध्ये विज्ञानाचे महत्त्व’ पोलीस खेळाडूंना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2016 12:51 AM2016-09-21T00:51:05+5:302016-09-21T00:51:05+5:30
पोलीस दलातील कार्यरत अधिकारी व कर्मचारी हे शारिरीक व मानसिक दृष्ट्या मजबुत, सदृढ तसेच तणाव मुक्त राहण्याकरिता...
चंद्रपूर : पोलीस दलातील कार्यरत अधिकारी व कर्मचारी हे शारिरीक व मानसिक दृष्ट्या मजबुत, सदृढ तसेच तणाव मुक्त राहण्याकरिता सर्व जिल्ह्यात पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांकरिता क्रीडा स्पर्धाचे आयोजन केल्या जाते. नुकतेच पोलीस क्रीडा स्पर्धा पार पडल्या. आता खेळाडूंचे लक्ष लागले ते परीक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांचे ज्या करीता पोलीस विभागात कार्यरत असलेले खेळाडू अथक परिश्रम घेत आहे. या खेळाडूचे आपल्या खेळाप्रती अधीक उत्साह व मनोबल वाढावे याकरिता चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शन विशेष खेळाडूंकरिता मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.
सोमवारी पोलीस मुख्यालय येथील ड्रिल शेड येथे ‘खेळामध्ये विज्ञानाचे महत्त्व’ या विषयावर पोलीस विभागातील खेळाडू करिता मार्गदर्शन कार्यक्रम झाला. प्रमुख वक्ते व तज्ञ मार्गदर्शक म्हणून मराठी विज्ञान परिषदेचे सुरेश चोपणे उपस्थित होते.
प्रत्येक क्रीडा प्रकारात विज्ञानाची कास धरून तांत्रिक पद्धतीचा अवलंबन करून सराव केल्यास इच्छीस यश प्राप्त करणे सहज शक्य होते. यामध्ये गुरुत्वाकर्षणासारखे भौगोलिक नियमाची जाण असणे, सरावादरम्यान आहार विहार याची विशेष काळजी घेणे, त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मनाची शक्ती कशाप्रकारे वाढवावी इत्यादी विषयावर प्रमुख वक्ते, तज्ञ मार्गदर्शक सुरेश चोपणे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, उपपोलीस अधीक्षक जयचंद्र काठे, राखीव पोलीस निरीक्षक रघुनाथ चौधरी, राखीव पोलीस उपनिरीक्षक पी.दलाई उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्याचे पोलीस अधीक्षक यांचे हस्ते पुस्तक देवून स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक अपर पोलीस पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांनी केले तर आभार उपपोलीस अधीक्षक जयचंद्र काठे यांनी मानले.
जिल्हा पोलीस दलातर्फे विविध उपक्रम राबवून खेळाडूंचे मनोबल वाढविले जात आहे. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे प्रयत्न सुरू आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)